जितेश्री दमालेच्या वादळी शतकाने जालना संघ १४२ धावांनी विजयी

  • By admin
  • March 4, 2025
  • 0
  • 48 Views
Spread the love

एमसीए महिला क्रिकेट लीग

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत जालना महिला संघाने विजय महिला संघाचा १४२ धावांनी पराभव केला. शतकवीर जितेश्री दमाले (नाबाद १२५) ही सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

पुण्यात झालेल्या या सामन्यात जालना महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ४५ षटकात सात बाद २६९ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. जितेश्री दमाले हिने अवघ्या ७९ चेंडूत नाबाद १२५ धावांची खेळी करत सामना गाजवला. जितेश्रीने आपल्या आक्रमक शतकी खेळीत २१ चौकार व एक षटकार मारला. रुशिता जंजाळ (४३) व कार्तिकी देशमुख (४१) यांनी शानदार फलंदाजी करत डावाला आकार देण्यात मोलाचे योगदान दिले. आरुषी गलांडे (३), मीना गुरवे (६), ईशानी वर्मा (०), शुभांगी मिश्रा (३), रुही सिंग (०) यांनी निराशा केली. साक्षी सिरसाट ६ धावांवर नाबाद राहिली. इतर ४२ धावांमुळे जालना संघाची स्थिती अधिक भक्कम झाली.

विजय महिला संघाकडून साईश्री बनसोडे हिने ३८ धावांत तीन विकेट घेतल्या. अनन्या कोकाटे (१-२८), मेहर नाज (१-८०), पलक वर्पे (१-५८) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

विजय महिला संघाला विजयासाठी २७० धावांची गरज होती. मात्र, विजय संघ ४५ षटकात सात बाद १२७ धावा काढण्यात यश आले. यात साईश्री बनसोडे हिने सर्वाधिक ३७ धावा काढल्या. ओवी गजमल (१७), जेनिश्रेया पवार (२१) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठला. अन्य फलंदाज धावांचा दुहेरी आकडा देखील गाठू शकले नाहीत.

जालना संघाकडून जितेश्री दमाले हिने २३ धावांत चार विकेट घेऊन संघाचा विजय सुकर बनवला. ईशानी वर्मा हिने १० धावांत एक बळी घेतला. रुशिता जंजाळ हिने २० धावांत २ बाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *