
विभागीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धा
बार्शी ः कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मामा यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या पुरुष गटाच्या विभागीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धेत धाराशिवचे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ व सोलापूरच्या किरण स्पोर्टस् क्लब या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएसनच्या मान्यतेने ही स्पर्धा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशनने आयोजित केली आहे. कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या कर्मवीर मैदानावर मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात जितेंद्र वसावे व श्याम ढोबळे (५ गडी) यांच्या शानदार खेळीमुळे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने धाराशिवच्या तुळजाभवानी क्रीडा मंडळावर २०-१४ असा ६ गुणांनी पराभव केला. तुळजाभवानी मंडळाच्या रमेश वसावेने आक्रमणात ५ गडी बाद करीत १.३० मिनिटे संरक्षण केले. त्याची व विशाल वसावे (१.५० मिनिटे व २ गुण) यांची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.
किरण स्पोर्ट्सने वेळापूरला नमविले
उपांत्य फेरीच्या दुसरा सामना सोलापूर जिल्ह्यातील दोन संघात अत्यंत चुरशीचा झाला. वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाला सोलापूरच्या किरण स्पोर्ट्स क्लबने हाफ टाइमला ८-९ अशा एका गुणाच्या पिछाडीवरून १७-१६ असे एका गुणानेच नमविले. अक्षय इंगळे, सौरभ चव्हाण, चेतन चव्हाण व रोहन रजपूत हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. वेळापूरच्या कृष्णा बनसोडे, प्रणव अडसूळ व अजित रणदिवे यांची अष्टपैलू लढत अपुरी पडली.