
अनुश्री स्वामी, साक्षी शिंदे यांची धमाकेदार द्विशतके, नांदेड संघाचा ३३२ धावांनी पराभव
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत हिंगोली महिला संघाने नांदेड महिला संघावर ३३२ धावांनी विक्रमी विजय नोंदवला. अनुश्री स्वामी (२४६) आणि साक्षी शिंदे (२२८) यांनी धमाकेदार द्विशतक ठोकून संघाला विक्रमी विजय मिळवून दिला.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर हिंगोली व नांदेड यांच्यात सामना झाला. हिंगोली महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४७ षटकांत तीन बाद ५३० असा धावांचा डोंगर उभारला. आतापर्यंत ही या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना नांदेड महिला संघ ४२ षटकात १९८ धावांत सर्वबाद झाला. हिंगोली संघाने तब्बल ३३२ धावांनी विक्रमी विजय साकारला.
हा सामना हिंगोलीच्या अनुश्री स्वामी व साक्षी शिंदे या दोन खेळाडूंच्या वादळी फलंदाजीने गाजला. अनुश्री हिने अवघ्या १४० चेंडूंत २४६ धावांची तुफानी खेळी केली. अनुश्रीने आपल्या द्विशतकी खेळीत ४४ चौकार व एक षटकार मारला. कर्णधार साक्षी शिंदे हिने १३६ चेंडूंचा सामना करत २२८ धावांची वादळी द्विशतक साजरे केले. साक्षीने आपल्या धमाकेदार फलंदाजीत ४१ चौकार ठोकले. नांदेडच्या अनुष्का रंजने हिने १११ चेंडूत ६० धावांची खेळी केली. तिने १० चौकार मारले. गोलंदाजीत कविता कुवर हिने ३६ धावांत चार विकेट घेत आपली चमक दाखवली. अनुश्री हिने ९ धावांत दोन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. जान्हवी बरोले हिने ४० धावांत एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक ः हिंगोली महिला संघ ः ४७ षटकात तीन बाद ५३० (साक्षी शिंदे २२८, अनुश्री स्वामी नाबाद २४६, साक्षी गोरे ४, धनश्री मोरे ८, ज्योती शिंदे नाबाद ३, इतर ४१, काजल इंगुळकर १-८६, शिवानी कापसे १-६२) विजयी विरुद्ध नांदेड महिला संघ ः ४२ षटकात सर्वबाद १९८ (काजल इंगुळकर ७, निधी निलावर १०, साक्षी जाधव ३०, आकांक्षा रंजने नाबाद ६०, प्रतिक्षा दामसे १४, शितल पोहरे ९, शिवानी कापसे ८, इतर ५७, कविता कुवर ४-३६, अनुश्री २-९, कल्याणी खंडागळे १-२८, जान्हवी बरोले १-४०, साक्षी गोरे १-१४). सामनावीर ः अनुश्री स्वामी.