
कर्णधार मुक्ता मगरे, यशोदा घोगरेची शानदार कामगिरी
पुणे ः एमसीए महिला एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महिला संघाने पीबीकेजेसीए संघावर सहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. कर्णधार मुक्ता मगरे हिने ८१ धावांची शानदार खेळी करत सामनावीर किताब संपादन केला.
परंडवाल क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. पीबीकेजेसीए महिला संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात सहा बाद २३० धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना छत्रपती संभाजीनगर महिला संघाने ३७.४ षटकात चार बाद २३१ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला.

या सामन्यात कर्णधार मुक्ता मगरे हिने ६९ चेंडूत ८१ धावांची आक्रमक खेळी केली. तिने आठ चौकार मारले. स्नेहा भंडारे हिने १२ चौकारांसह ७२ धावा फटकावल्या. यशोदा घोगरे हिने ६३ धावांची उत्कृष्ट खेळी करताना सात चौकार मारले. गोलंदाजीत भूमिका चव्हाण हिने ३९ धावांत तीन विकेट घेतल्या. प्रेरणा सावंत हिने ३९ धावांत दोन तर दिव्या येडे हिने ३५ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः पीबीकेजेसीए महिला संघ ः ५० षटकात सहा बाद २३० (यशश्री राजेदेशमुख ४९, स्नेहा भंडारे ७२, चार्मी नाबाद ४८, साक्षी पानसरे ८, दिव्या येडे नाबाद १२, इतर २७, भूमिका चव्हाण ३-३९, यशोदा घोगरे १-५२, मुक्ता मगरे १-३६) पराभूत विरुद्ध छत्रपती संभाजीनगर महिला संघ ः ३७.४ षटकात चार बाद २३१ (जिया सिंग ३६, काव्या गुळवे १५, माधुरी आघाव ६, मुक्ता मगरे नाबाद ८१, यशोदा घोगरे नाबाद ६३, इतर ३०, प्रेरणा सावंत २-३९, दिव्या येडे २-३५). सामनावीर ः मुक्ता मगरे.