पराभवाचा बदला घेत भारत अंतिम फेरीत

  • By admin
  • March 4, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया संघावर ४ विकेटने विजय; विराट कोहलीची दमदार ८४ धावांची खेळी निर्णायक 

दुबई : अनुभवी स्टार फलंदाज विराट कोहलीच्या दमदार ८४ धावांच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर चार विकेट राखून दिमाखदार विजय साकारत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. भारतीय संघाने सलग चार सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होईल. 

भारतीय संघासमोर विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य होते. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमकपणे केली. द्वारशुईस याने गिलला ८ धावांवर क्लिन बोल्ड करुन भारताला पहिला धक्का दिला. दरम्यान, रोहित शर्माला दोनदा जीवदान लाभले. रोहितने २९ चेंडूत २८ धावा फटकावल्या. रोहितने एक षटकार व तीन चौकार मारले. दोन जीवदानांचा फायदा रोहित उठवू शकला नाही. कूपर कॉनोली याने त्याला पायचीत बाद करुन मोठा धक्का दिला. 

रोहित-गिल बाद झाल्यानंतर अनुभवी विराट कोहली व श्रेयस अय्यर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. ही जोडी धोकादायक बनत असताना झांपा याने श्रेयस अय्यरला क्लीन बोल्ड करुन सामन्यात पुन्हा रंगत आणली. अय्यर ४५ धावांवर बाद झाला. त्याने तीन चौकार मारले. झांपाच्या डावातील २७व्या षटकात विराट कोहलीला जीवदान मिळाले. ग्लेन मॅक्सवेल याने सोपा झेल सोडला. तेव्हा विराट ५१ धावांवर खेळत होता. त्यानंतर झांपाने अय्यरची विकेट घेत एकच जल्लोष केला. 

विराट कोहली आणि अक्षर पटेल या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५२ चेंडूत ४४ धावांची भागीदारी करत संघाला विजयपथावर आणले. नॅथन एलिसला जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेल याने आपली विकेट गमावली. तो ३० चेंडूत २७ धावा काढून क्लीन बोल्ड जाला. त्याने एक षटकार व एक चौकार मारला. 

कोहलीची शानदार फलंदाजी 

विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने ४७ धावांची भागीदारी करुन संघाला विजयासमीप आणले. विराट कोहली षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेलबाद झाला. झाम्पाने कोहलीची विकेट घेऊन सामन्यात पुन्हा एकदा रंगत आणली. कोहलीने ९८ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची दमदार खेळी साकारली. विराटने पाच चौकार मारले. राहुने षटकार ठोकल्यानंतर कोहली षटकार मारण्याचा मोह टाळू शकला नाही आणि त्याने सोपा झेल देऊन विकेट गमावली. नवख्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारतीय फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. 

केएल राहुल आणि हार्दिक पंड्या या जोडीवर भारतीय संघाची मोठी भिस्त होती. हार्दिकने झाम्पाला सलग दोन उत्तुंग षटकार ठोकत संघावरील दबाव दूर केला. विजयासाठी सहा धावांची गरज असताना षटकार मारण्याच्या प्रयत्नात हार्दिक सीमारेषेवर मॅक्सवेलच्या हातात झेल देऊन तंबूत परतला. हार्दिकने २४ चेंडूत २८ धावांचे योगदान देऊन संघाचा विजय निश्चित केला. त्याने तीन टोलेजंग षटकार व एक चौकार मारला. त्यानंतर केएल राहुल याने उत्तुंग षटकार ठोकत संघाच्या दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने ३४ चेंडूत नाबाद ४२ धावांची दमदार खेळी करत मोलाचे योगदान दिले. राहुलने दोन षटकार व दोन चौकार मारले. रवींद्र जडेजा याने नाबाद २ धावा काढल्या. भारताने ४८.१ षटकात सहा बाद २६७ धावा फटकावत अंतिम फेरी गाठली. या विजयासह भारतीय संघाने विश्वचषक फायनलमधील पराभवाचा बदला घेत ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आणले. 

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस (१-४९), अॅडम झाम्पा (२-६०) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. बेन द्वारशुइस (१-३९), कूुपर कॉनोलीि (१-३७) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

ऑस्ट्रेलिया सर्वबाद २६४ 

ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७३ धावांची चांगली खेळी केली. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ३ विकेट घेतल्या. त्यामध्ये स्मिथचा महत्त्वाचा बळी समाविष्ट होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड आणि कपूर कॉनोलीसह डावाची सुरुवात केली. कोनोलीला (०) बॅटने चेंडूही खेळता आला नाही, शेवटी त्याला मोहम्मद शमीने विकेटमागे झेलबाद केले. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. क्रीजवर स्थिरावल्या नंतर ट्रॅव्हिस हेडने स्फोटक फलंदाजी सुरू केली. परंतु वरुण चक्रवर्तीने त्याचा डाव मोठा होऊ दिला नाही. ट्रॅव्हिस हेडने ३३ चेंडूत ३९ धावा केल्या.

स्टीव्ह स्मिथ आणि अ‍ॅलेक्स कॅरीची अर्धशतके
सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने जबाबदारी स्वीकारली आणि ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ९६ चेंडूंच्या या खेळीत स्टीव्ह स्मिथने १ षटकार आणि ४ चौकार मारले. ३७ व्या षटकात मोहम्मद शमीने स्मिथला क्लीन बोल्ड केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर पाच बाद १९८ असा होता. त्यानंतर स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ७ धावांवर क्लीन बोल्ड झाला. तो अक्षर पटेलचा बळी ठरला. अ‍ॅलेक्स कॅरीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. कॅरीने डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली. त्याने ५७ चेंडूत ६१ धावा केल्या. या डावात त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. ऑस्ट्रेलियाने ४९.३ षटकात सर्वबाद २६४  धावा काढल्या. 

शमी सर्वात किफायतशीर गोलंदाज 

मोहम्मद शमीने स्टीव्ह स्मिथसह ३ विकेट घेतल्या. तो सर्वात किफायतशीर गोलंदाज होता. त्याने त्याच्या १० षटकांच्या स्पेलमध्ये ४.८० च्या इकॉनॉमी रेटने ४८ धावा दिल्या. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

वरुण चक्रवर्ती याने पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडची मोठी विकेट घेत चाहत्यांना खुश करून टाकले. वरुणने १० षटकांत ४.९० च्या इकॉनॉमीने ४९ धावा दिल्या. जडेजाने ८ षटकांत ५ च्या इकॉनॉमीने ४० धावा दिल्या. या डावात सर्वात महागडा ठरलेला हार्दिक पंड्या याला एक विकेट मिळाली. त्याने ५.३ षटकांत ७.२७ च्या इकॉनॉमीने ४० धावा दिल्या. १ विकेट अक्षर पटेलला गेली, जी ग्लेन मॅक्सवेलची होती.

रोहितने १४व्यांदा नाणेफेक गमावली 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्यात अपयशी ठरला. अशाप्रकारे, रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग १४ व्यांदा नाणेफेक गमावली आहे. आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराने इतक्या सलग वेळा नाणेफेक गमावलेली नाही. रोहित शर्मा नंतर वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ब्रायन लारा सलग १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये नाणेफेक हरत राहिला. रोहित शर्मा आणि ब्रायन लारा नंतर, नेदरलँड्सचा पीटर बोरेन तिसऱ्या स्थानावर आहे. पीटर बोरेन सलग ११ सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *