
१२ सुवर्ण, १३ रौप्य, ११ कांस्य पदके जिंकली
नागपूर ः किक स्टार स्पोर्ट असोसिएशन आणि गुरुदेव स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ओपन गट विदर्भस्तरीय योगासन स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स हुडकेश्वर येथील खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या खेळाडूंनी एकूण ३६ पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली.
या योगासन स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या खेळाडूंनी १२ सुवर्ण, १३ रौप्य आणि ११ कांस्य पदकांची कमाई करत आपल्या शालेय क्रीडा परंपरेला साजेसे यश मिळवून दिले. विशेष म्हणजे या स्पर्धेत एकूण ५२ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. खेळाडूंच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका आरती चौबे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
या खेळाडूंना प्रशिक्षक योग शिक्षिका सारिका पेंदाम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून आणि सातत्याने दिलेले प्रोत्साहनामुळेच विद्यार्थ्यांनी ही मोठी कामगिरी केली. या यशाबद्दल त्यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. योगासारख्या प्राचीन क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांना पुढील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी प्रेरणा देणारे ठरेल असे मत मार्गदर्शक सारिका पेंदाम यांनी व्यक्त केले.