
छत्रपती संभाजीनगर ः ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या जय माँ भारती नृत्य महोत्सवात महाराष्ट्राची लोककला सादर करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, संगीत नाटक अकादमीतर्फे देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या प्रा. मयुरी प्रविणसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली होती. भारतातील २९ राज्यातील पाच हजार कलाकारांनी आपापल्या राज्यातील लोकनृत्य सादर केले. महाराष्ट्रातील १४० कलाकारांच्या संचानी महाराष्ट्राची लोककला कोळी नृत्य सादर केले. जय माँ नृत्य महोत्सवाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वात मोठे भारतीय लोकनृत्य म्हणून करण्यात आली.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे, देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांच्या मयुरी राजपूत यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कनिष्ठ विज्ञान विभागाचे उपप्राचार्य नंदकिशोर गायकवाड, कला व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य सुरेश लिपाने, एमसीव्हीसी विभागाचे उपप्राचार्य विजय नलावडे, सर्व पर्यवेक्षक, विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.