
मुंबई ः महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स आणि मल्लखांब खेळातील यशस्वी खेळाडूंचा नुकताच चेंबूर येथील श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सभागृहात कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी केली असून, मल्लखांब आणि जिमनॅस्टिक्स खेळातील खेळाडूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाराष्ट्राने जिम्नॅस्टिक्समध्ये ४ सुवर्ण, १ रौप्य, आणि मल्लखांब खेळात ४ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य पदके जिंकली. याशिवाय, सुरत येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत देखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगले यश मिळवले.
या सोहळ्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्स खेळाडूंचा गौरव अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त अॅड सुबोध आचार्य, बृहन्मुंबई जिल्हा जिम्नास्टिक संघटनेचे अध्यक्ष इंद्रजीत राठोड, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष करुणाकर शेट्टी, चेंबूर विधानसभा विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, मुंबई जिम्नॅस्टिक संघटनेचे उपाध्यक्ष अॅड शरद भोसले, नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पाटील आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्यात श्री शिव छत्रपती पुरस्कार आणि उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त राहुल ससाने, सुनील रणपिसे, योगेश पवार, सुनील गंगावणे यांचा देखील गौरव करण्यात आला.
या खेळाडूंच्या कौतुक सोहळ्याच्या आयोजनासाठी बृहन्मुंबई जिल्हा जिम्नास्टिक संघटना, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना, स्पोर्ट्स अॅक्रोबॅटिक्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, लोकमान्य शिक्षण संस्था, शरद आचार्य क्रीडा केंद्र, आणि सुकहारा स्पोर्ट्स अकॅडमी यांचे सहकार्य मिळाले. या समारंभामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढले असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांचा आत्मविश्वास देखील वृद्धिंगत झाला आहे.