
सचिन तेंडुलकर क्लबमध्ये सामील
दुबई ः भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा लक्ष्याचा पाठलाग करताना एकदिवसीय सामन्यात ८००० पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. यासोबतच किंंग कोहली महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये सामील झाला.
दुबईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य सामन्यात विराट कोहली याने ही शानदार कामगिरी केली. कोहलीने एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना शानदार अर्धशतक ठोकले आणि ८ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या.
कोहलीने ७४ वे अर्धशतक ठोकले
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीने ५३ चेंडूत ७४ वे अर्धशतक झळकावले. कोहलीने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. या सामन्यात कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तो त्याच्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करू शकेल अशी चाहत्यांना आशा आहे. परंतु, षटकार मारण्याच्या प्रयत्नात कोहली बाद झाला आणि त्याचे शतक हुकले.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये १३३ धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील ५१ वे शतक झळकावले. यादरम्यान, कोहलीने १०० धावा करून नाबाद राहिला आणि भारताच्या सहा विकेटने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
बाद फेरीच्या सामन्यात किंग कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कोहली भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला. त्याने ५४९ सामन्यांमध्ये ३३६ झेल घेतले आहेत. या बाबतीत त्याने राहुल द्रविडला मागे टाकले, ज्याने ५०४ सामन्यांमध्ये ३३३ झेल घेतले.