
भारतीय संघाविरुद्ध पराभव झाल्यानंतर घेतला निर्णय
दुबई ः चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथ याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी याची घोषणा केली. मंगळवारी ऑस्ट्रेलियाला भारताकडून चार विकेटने पराभव पत्करावा लागला. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथ संघाचे नेतृत्व करत होता. स्मिथ कसोटी खेळत राहणार आहे. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तो बराच काळ संघाबाहेर आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारताविरुद्धच्या चार विकेटनी पराभवानंतर स्मिथ याने त्याच्या सहकाऱ्यांना त्याचा निर्णय कळवला होता. तो टी २० आणि कसोटी क्रिकेट खेळत राहील. स्मिथ म्हणाला, ‘मला वाटते की इतरांसाठी जागा मोकळी करण्याची हीच योग्य वेळ आहे. हा एक अद्भुत प्रवास होता आणि मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. कसोटी क्रिकेटला प्राधान्य आहे आणि मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबद्दल उत्साहित आहे. त्यानंतर आपल्याला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे. मला वाटते की मी अजूनही योगदान देऊ शकतो.
स्मिथची एकदिवसीय कारकीर्द
स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी एकूण १७० एकदिवसीय सामने खेळले आणि ५८०० धावा केल्या. या काळात त्याची सरासरी ४३.२८ आणि स्ट्राईक रेट ८६.९६ होती. एकदिवसीय सामन्यातील त्याची सर्वोत्तम खेळी १६४ धावा आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५ अर्धशतके आणि १२ शतके झळकावली आहेत. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्मिथ फॉर्ममध्ये नव्हता. त्याने तीन डावांमध्ये ४८.५० च्या सरासरीने ९७ धावा केल्या. भारताविरुद्ध ७३ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी होती.
शमीने फुल टॉस बॉलवर स्मिथला क्लीन बोल्ड केले. स्मिथने १९ फेब्रुवारी २०१० रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. तो २०१५ आणि २०२३ मध्ये दोनदा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता.
स्मिथचे कसोटीतील आकडे प्रभावी
तथापि, स्मिथ कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याने सर्वात लांब फॉर्मेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ११६ कसोटी सामन्यांच्या २०६ डावांमध्ये स्मिथने ५६.७५ च्या सरासरीने १०,२७१ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी २३९ धावांची खेळी आहे. या काळात त्याने ३६ शतके आणि ४१ अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये चार द्विशतक यांचा समावेश आहे. स्मिथने ६७ टी २० सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने २४.८६ च्या सरासरीने आणि १२५.४६ च्या स्ट्राईक रेटने १०९४ धावा केल्या. त्याने टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाच अर्धशतकेही झळकावली आहेत.