
ईश्वरी सावकारचे आक्रमक शतक
चंदीगड ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला एकदिवसीय ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने पाँडिचेरी महिला संघाचा १२० धावांनी पराभव केला. ईश्वरी सावकार हिने आक्रमक शतक झळकावत सामना गाजवला.
चंदीगड येथील महाजन क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात तीन बाद २९३ अशी भक्कम धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व गाजवले. ईश्वरी सावकार हिने आक्रमक शतक साजरे केले. ईश्वरी हिने ११७ चेंडूंचा सामना करत ११५ धावांची धमाकेदार खेळी साकारली. या शतकी खेळीत तिने दहा चौकार मारले. सलामीवीर ईश्वरी आवासरे हिने ८२ चेंडूंत ८४ धावांची दमदार खेळी करत संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. तिने दोन उत्तुंग षटकार व ११ चौकार मारले. खुशी मुल्ला हिने चार चौकारांसह २४ धावांचे योगदान दिले. भाविका अहिरे हिने ६१ चेंडूत ४७ धावा फटकावल्या. भाविकाने पाच चौकार मारले. आयशा शेख तीन चौकारांसह १५ धावा काढून नाबाद राहिली. पाँडिचेरी संघाकडून तेजस्विनी (१-५३), पूजा (१-४९) व अबीरामे (१-५५) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
पाँडिचेरी संघासमोर विजयासाठी २९४ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाँडिचेरी संघ ५० षटकात सात बाद १७३ धावा काढू शकला. त्यामुळे महाराष्ट्र संघाने हा सामना तब्बल १२० धावांनी जिंकत आगेकूच केली.
पाँडिचेरी संघाकडून ई कविशा हिने सर्वाधिक ५८ धावा काढल्या. तिने एक षटकार व सात चौकार मारले. अंजना (४०), युवश्री (१९), अनिका कुमारेसन (नाबाद १६) यांनी आपले योगदान दिले.
महाराष्ट्र महिला संघाकडून इशिता खळे ही सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरली. तिने ४१ धावांत तीन विकेट घेतल्या. गायत्री सुरवसे हिने ३१ धावांत दोन बळी घेतले. श्वेता सावंत हिने २६ धावांत एक गडी बाद केला. पठारे हिने २३ धावांत एक बळी मिळवला.