
रचिन रवींद्र, केन विल्यमसन विजयाचे हिरो; दक्षिण आफ्रिका संघ ५० धावांनी पराभूत
लाहोर : रचिन रवींद्र (१०८) आणि केन विल्यमसन (१०२) यांच्या धमाकेदार शतकांच्या बळावर न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा ५० धावांनी पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. येत्या रविवारी न्यूझीलंड संघाचा सामना भारतीय संघाशी होईल.
दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी तब्बल ३६३ धावांचे लक्ष्य होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी धावसंख्या पार करुन विजय नोंदवणे आफ्रिका संघाच्या आवाक्याबाहेरचे ठरले. दक्षिण आफ्रिका संघ ५० षटकात नऊ बाद ३१२ धावा काढण्यात यशस्वी ठरला.
सलामीवीर रायन रिकेल्टन १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत सामन्यातील रंगत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही जोडी बाद झाल्यानंतर आफ्रिका संघ ठराविक अंतराने विकेट गमावत राहिला. बावुमा (५६), ड्यूसेन (६१) यांनी अर्धशतके ठोकली. परंतु, धावगती वाढत राहिल्याने फलंदा्जांवर दडपण वाढत गेले. या दबावाचा फायदा उठवत सँटनर याने ४३ धावांत तीन विकेट घेऊन आफ्रिका संघाचा पराभव निश्चित केला.
एडेन मार्क्रम (३१), हेनरिक क्लासेन (३) हे आक्रमक फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर आफ्रिका संघाच्या विजयाची आशा संपुष्टात आली. मुल्डर (८), जॅनसेन (३), केशव महाराज (१), रबाडा (१६) हे तळाचे फलंदाज एका बाजूने बाद होत असताना डेव्हिड मिलर याने झुंज देत नाबाद १०० धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या षटकापासून बचावात्मक खेळताना दिसला. त्यामुळे ते विजयाच्या शर्यतीत आहे असे कधीच वाटले नाही. मिलरने ६७ चेंडूत १०० धावा फटकावल्या. त्यात त्याने चार उत्तुंग षटकार व १० चौकार मारले. मिलरच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिका संघ ५० षटकात नऊ बाद ३१२ धावापर्यंत मजल मारू शकला. न्यूझीलंडने ५० धावांनी सामना जिंकत अंतिम फेरी गाठली. मॅट हेन्री (२-४३), ग्लेन फिलिप्स (२-२७) यांनी प्रभावी कामगिरी नोंदवली.
न्यूझीलंड संघाची विक्रमी धावसंख्या
तत्पूर्वी, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३६३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. केन विल्यमसन (१०२) आणि रचिन रवींद्र (१०८) यांनी धमाकेदार शतकं ठोकली. तसेच डॅरिल मिशेल (४९) आणि ग्लेन फिलिप्स (४९) यांनी डेथ ओव्हर्समध्ये स्फोटक फलंदाजी केली. तथापि, मिशेल आणि फिलिप्स दोघेही आपापल्या अर्धशतकांपासून वंचित राहिले. न्यूझीलंडने केलेली ३६२ धावांची ही खेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.
रचिन रवींद्र पहिला खेळाडू
रचिन रवींद्र आयसीसी स्पर्धेत सर्वात जलद ५ शतके करणारा फलंदाज ठरला आहे. आयसीसी स्पर्धेत ही त्याची १३ वी शतकी खेळी होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन शतके करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला. केन विल्यमसननेही शतकी खेळी केली. त्याने ९४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. यादरम्यान, विल्यमसनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १९ हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
२०३ धावांची भागीदारी
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडला सुरुवातीलाच धक्का बसला कारण विल यंग (२१) ४८ धावांवर बाद झाला. त्यानंतर केन विल्यमसन (१०२) आणि रचिन रवींद्र (१०८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी २०३ धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीमुळे सामन्याचे चित्र बदलून गेले.
ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांनी डेथ ओव्हर्समध्ये स्फोटक खेळी केली. डॅरिल मिशेलने शेवटच्या षटकांमध्ये शानदार खेळी केली आणि संघाचा धावसंख्या ३०० च्या पुढे नेली. तथापि, तो त्याच्या अर्धशतकापासून १ धावेने वंचित राहिला. तो ३७ चेंडूत ४९ धावा काढून बाद झाला, या डावात त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. ग्लेन फिलिप्सचेही अर्धशतक १ धावेने हुकले. त्याने २७ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. या डावात त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला.
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज विलेम मुल्डर सर्वात महागडा ठरला. त्याने ६ षटकांत ४८ धावा दिल्या. मार्को जॅन्सेनने १० षटकांत ७९ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याने त्याच्या १० षटकांच्या स्पेलमध्ये ७२ धावा दिल्या.