
गरवारे क्रिकेट स्टेडियम येथे शुक्रवारपासून रंगणार उत्सव
छत्रपती संभाजीनगर : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे सीएमआयए क्रिकेट उत्सवाचे आयोजन ७ ते ९ मार्च या कालावधीत गरवारे स्टेडियम येथे करण्यात आले आहे. हा डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा उत्सव उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणण्यासाठी आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी आयोजित केली जात आहे.
क्रिकेट उत्सव स्पर्धा आयोजित करण्यामागची संकल्पना सांगताना सीएमआयए अध्यक्ष अर्पित सावे म्हणाले की, सीएमआयए ही संस्था फक्त औद्योगिक वाढीसाठी, आर्थिक आरोग्याबद्दल बोलत नाही किंवा उद्योगांवरील समस्या व प्रश्न यावर चर्चा करत नाही, तर या क्षेत्रात सौहार्द निर्माण करण्याचेही काम करत आहे. आज सीएमआयएमध्ये प्रदेशातील ८०० हून अधिक सदस्य आहेत आणि सीएमआयएचे उद्दिष्ट आहे की हे सर्व सदस्य एका व्यासपीठावर एकत्र आणावेत, जिथे मल्टीनॅशनल कंपनी, लघु आणि मध्यम उद्योग प्रतींनिधी एकत्र येऊन क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेऊ शकतात.
सीएमआयए मानद सचिव अथर्वेशराज नंदावत म्हणाले की, हा क्रिकेट उत्सव केवळ एक क्रिकेट स्पर्धा नाही तर, हा आमच्या औद्योगिक समुदायाला एकत्र आणण्याचा एक अनोखा उपक्रम आहे. कुटुंब, सहकारी आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींमध्ये स्नेहबंध वाढवण्यासाठी तसेच आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी ही एक सुंदर संधी आहे., असे ते म्हणाले. या स्पर्धेत सीएक्सओ, उद्योगपती आणि वरिष्ठ व्यवस्थापक सहभागी होत असून, त्यामुळे हा एक रोमांचक आणि चुरशीचा क्रिकेट सोहळा ठरणार आहे.

स्पर्धेत भाग घेणारे ६ संघ आणि त्यांचे मालक
या स्पर्धेत एकूण सहा संघांचा सहभाग आहे. त्यात प्रामुख्याने एआयटीजी सुपर किंग्ज (मिहीर सौंदलगेकर), बेलाइट बाहुबलीज् (हर्षजीत भट), कॅन पॅक वॉरियर्स (जनार्दन काळे), सिएल कासा स्ट्रायकर्स (आदर्श अग्रवाल), ग्रीन गोल्ड ११ (अजित मुळे) व लाइफलाइन मॅव्हरिक्स (विक्रांत भाले) या संघांचा समावेश आहे.
ही स्पर्धा लाइफलाइन मेडिकल डिव्हाइसेस यांच्याद्वारे प्रायोजित असून एंड्रेस हाउझर आणि पाटील ट्रान्सपोर्ट यांनी यास सहप्रायोजकत्व दिले आहे. या स्पर्धेचे उत्सव बाहेती यांची संयोजक, तर मिहिर सौंदलगेकर, अनिकेत पाटील आणि हर्षित मोदाणी हे सह-संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत
या क्रिकेट स्पर्धेसोबतच सीएमआयएने हा एक कार्निव्हल स्वरूपाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले असून उपस्थितांसाठी अनेक मनोरंजनात्मक आणि कुटुंब स्नेही उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.