
वसमत येथे बहिर्जी महाविद्यालयात आयोजन
हिंगोली ः हिंगोली जिल्हा खो-खो संघटनेतर्फे वसमत येथे रविवारी (९ मार्च) हिंगोली जिल्ह्याचा पुरुष व महिला खो-खो संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने १३ ते १६ मार्च दरम्यान पुरुष आणि महिला खो-खो राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा शेवगाव (अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आली आहे. या राज्य स्पर्धेसाठी हिंगोली जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ रविवारी होणाऱया निवड चाचणीतून निवडण्यात येणार आहे.
वसमत येथील बहिर्जी महाविद्यालय मैदानावर रविवारी सकाळी १० वाजता निवड चाचणीला सुरुवात होईल. निवड चाचणी बहिर्जी महाविद्यालयाचे प्राचार्य एम एम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवेश्वर नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार, उद्घाटक म्हणून शिवेश्वर नागरी सहकारी बॅंकेचे संचालक डॉ धोंडीराम पार्डीकर हे उपस्थित राहणार आहेत.
निवड चाचणीसाठी खेळाडूंनी आधार कार्ड, जन्म दाखला, दोन पासपोर्ट फोटोसह वेळेवर उपस्थित रहावे. यातून निवडलेला संघ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. निवड समिती सदस्य म्हणून अमोल मुटकुळे, संजय भुमरे, प्रा नरेंद्र रायलवार, प्रा निरंजन आकमार, मनोज टेकाळे हे काम पाहणार आहेत.
निवड चाचणीमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन हिंगोली जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार, जिल्हा खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष मनीषा काटकर, उपाध्यक्ष संदीप सोनी, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन तांत्रिक समितीचे अध्यक्ष आणि हिंगोली जिल्हा ॲम्युचर खोखो असोसिएशनचे सचिव डॉ नागनाथ गजमल, बाळासाहेब कोसलगे, प्रवीण शेळके, शिवाजी कट्टेकर, प्रा मीनानाथ गोमचाळे, प्रा आनंद भट्ट, नाना शिंदे, अमोल मुटकुळे, मारुती अलकटवार, मनोज टेकाळे यांनी केले आहे.