
स्पर्धेचे यंदाचे ३२ वे वर्ष
छत्रपती संभाजीनगर ः शहीद भगतसिंह औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धा येत्या २८ मार्चपासून आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे ३२ वेे वर्ष असून ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या सहकार्याने गरवारे क्रीडा संकुल येथे खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा अगोदर साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येईल. या स्पर्धेचे प्रवेशिका सिटू भवन अजबनगर येथे उपलब्ध असतील, अशी माहिती संयोजक सचिव दामोदर मानकापे यांनी दिली.
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी या हेतूने ज्येष्ठ कामगार नेते स्व उद्धव भवलकर व दामोदर मानकापे यांनी शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रारंभ केला. मागील वर्षी या स्पर्धेमध्ये ३६ संघांनी सहभाग घेतला होता. औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यासाठी सलग ३१ वर्षे चालणारी ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेचे वाळूज येथील कॉस्मो फिल्म्स कंपनीने स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
ही स्पर्धा आयसीसी टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार खेळवली जाईल. या स्पर्धेतील सामने शुक्रवार, शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघामध्ये एकाच उद्योगातील अथवा अस्थापनातील दहा कामगार खेळाडू असणे गरजेचे आहे. तीन खेळाडू इतर संस्थांमधील आणि इतर अस्थापणातील तसेच एक ओपन खेळाडू संघामध्ये असतील. एक शालेय खेळाडू तसेच महाराष्ट्रातील असोसिएशन, कारखाने यांच्यात काम करणारे खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र राहतील.
विजेत्या संघास ३५ हजार रुपये व करंडक तर उपविजेत्या संघास २५ हजार रुपये व करंडक दिला जाणार आहेत. तसेच वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्याची अंतिम तारीख १२ मार्च असून या स्पर्धेचे ड्रॉ १७ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता निश्चित करण्यात येणार आहे, असे स्पर्धेचे संयोजक दामोदर मानकापे, राजेश सिद्धेश्वर, गंगाधर शेवाळे, अनंत नेरळकर, उदय बक्षी, संदीप भंडारी, सागर वैद्य, राकेश सूर्यवंशी, डॉ प्रशांत याकुंडी, जितेंद्र बरंजाळेकर, योगेश मानकापे दिली आणि या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जितेंद्र बरंजाळेकर (9689420246) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव दामोदर मानकापे यांनी केले आहे.