
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर झोन १ मध्ये आयोजित आंतर पदविका क्रीडा स्पर्धेत एमआयटी पॉलिटेक्निक रोटेगावच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांमध्ये विजेतेपद पटकावले.
अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात १०० मीटर धावणे, लांब उडी, २०० मीटर धावणे, भालाफेक, थाळीफेक तसेच ४x१०० रिले आणि कॅरम अशा विविध क्रीडा स्पर्धेत रोटेगाव एमआयटी विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. एमआयटी रोटेगावच्या मुलींनी देखील प्रभावी कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले आहे. १०० मीटर, २०० मीटर धावणे, लांब उडी, भालाफेक आणि ४x१०० रिलेमध्ये मुलींच्या संघांनी उपविजेतेपद मिळवले.
पीईएस पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरच्या आयोजनात झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत एमआयटी रोटेगावच्या तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतील प्रियंका कठाळे हिने १०० मीटर धावणे आणि लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील पूजा ठोंबरे हिने २०० मीटर धावणे आणि भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतील भक्ती मगर हिने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, वाळूज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कॅरम स्पर्धेत योगिता साळुंके, कोमल पठारे, ऋतुजा उबाळे आणि जयश्री गुंड यांनी सांधिक व वैयक्तिक पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. पीईएस कॉलेजमध्ये झालेल्या ४x१०० रिले स्पर्धेत आदित्य जाधव, अमर पेनुरकर, विशाल गायकवाड आणि मनोज काकडे यांनी उपविजेतेपद पटकावत आपली चमकदार कामगिरी सिद्ध केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा महेंद्र सैंदाने, प्रा अमोल काकडे, प्रा विजय तळेकर, प्रा अबीर क्षीरसागर आणि प्रा श्वेता कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. विजेत्यांचे जी एस मंडळाचे अध्यक्ष डॉ यज्ञवीर कवडे, महासंचालक प्रा मुनिष शर्मा, संस्थेचे प्राचार्य प्रा किशोर पाटील, डीन अकॅडमिक्स प्रा स्वप्नील पाठक, प्रशासकीय अधिकारी प्रा बाबासाहेब खरात तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.