
राशी व्यास, आचल अग्रवाल, सुहानी कहांडळची लक्षवेधक कामगिरी
सांगली ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत डीव्हीसीए (व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी) महिला संघाने धुळे महिला संघावर तब्बल २४८ धावांनी दणदणीत विजय साकारत आगेकूच केली. आचल अग्रवाल हिने सामनावीर किताब संपादन केला.
चिंतामणराव कॉलेज सांगली या ठिकाणी हा सामना झाला. डीव्हीसीए महिला संघाने नाणेफेक जिंकून ५० षटकात चार बाद २९३ असा धावांचा डोंगर उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. धुळे महिला संघ १५.५ षटकात अवघ्या ४५ धावांत सर्वबाद झाला. डीव्हीसीए महिला संघाने २४८ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात राशी व्यास हिने ९७ चेंडूत ९२ धावांची शानदार खेळी केली. तिचे शतक अवघ्या आठ धावांनी हुकले. या खेळीत तिने १२ चौकार मारले. सुहानी कहांडाळ हिने ८४ चेंडूत ८६ धावांची धमाकेदार खेळी केली. तिने १३ चौकार ठोकले. स्वांजली मुळे हिने आक्रमक ४० धावा फटकावल्या. तिने चार चौकार मारले. गोलंदाजीत आचल अग्रवाल हिने तीन षटकात एकही धाव न देता तीन विकेट घेत सामना गाजवला. गौरी अहिरे हिने ४४ धावांत तीन गडी बाद केले. समिधा चौगले हिने १ धाव देत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः डीव्हीसीए महिला संघ ः ५० षटकात चार बाद २९३ (सुहानी कहांडळ ८६, राशी व्यास ९२, आचल अग्रवाल ८, स्वांजली मुळे नाबाद ४०, आर्या जांभुळकर १७, आराध्या पवार नाबाद २९, इतर २१, गौरी अहिरे ३-४४, निकिता मोरे १-६०) विजयी विरुद्ध धुळे महिला संघ ः १५.५ षटकात सर्वबाद ४५ (उन्नती चौधरी १८, निकिता मोरे ५, इतर १८, आचल अग्रवाल ३-०, समिधा चौगले २-१, आर्या जांभुळकर २-१०, स्वांजली मुळे १-२९). सामनावीर ः आचल अग्रवाल.