
हेली मॅथ्यूज, अमेलिया केरची शानदार कामगिरी
लखनौ : हेली मॅथ्यूज (६८) आणि अमेलिया केर (५-३८) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने यूपी वॉरियर्स संघाचा सहा विकेट राखून पराभव करत महिला प्रीमियर लीग स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. या विजयासह मुंबईचे सहा सामन्यांत आठ गुण झाले आहेत.
मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान होते. गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणारी अमेलिया केर (१०) लवकर बाद झाली. चिनेल हेन्री हिने तिसऱ्या षटकात केर हिची विकेट घेऊन मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर हेली मॅथ्यूज व नॅट सायव्हर ब्रंट या जोडीने धमाकेदार फलंदाजी करत डाव सावरला. या जोडीने ९२ धावांची दमदार भागीदारी करत संघाला विजयासमीप आणले. नॅट सायव्हर ब्रंट २३ चेंडूत ३७ धावा काढून बाद झाली. तिने सात चौकार मारले.

सलामीवीर हेली मॅथ्यूज हिने ४६ चेंडूत ६८ धावांची धमाकेदार खेळी करुन सामना एकतर्फी बनवला. मॅथ्यूज हिने आक्रमक फलंदाजी करत दोन षटकार व आठ चौकार मारले. तिच्या शानदार फलंदाजीने मुंबईचा विजय अधिक सोपा झाला. कर्णधार हरमनप्रीत कौर (४) लवकर बाद झाली. त्यानंतर अमनजोत कौर (नाबाद १२) आणि यास्तिका भाटिया (नाबाद १०) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईने १८.३ षटकात चार बाद १५३ धावा फटकावत महत्त्वाचा विजय साकारला. यूपी संघाकडून ग्रेस हॅरिस (१-११), चिनेल हेन्री (१-२८), क्रांती गौड (१-३१) यांनी विकेट्स मिळवल्या.
अमेलिया केरची प्रभावी गोलंदाजी
मुंबई इंडियन्स संघाने यूपी वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यूपी वॉरियर्स संघाने २० षटकात नऊ बाद १५० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. ग्रेस हॅरिस व जॉर्जिया व्होल या सलामी जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. या जोडीने ८ षटकात ७४ धावांची धमाकेदार सुरुवात करुन दिली. हॅरिस २५ चेंडूत २८ धावा काढून बाद झाली. त्यानंतर ठराविक अंतराने यूपी संघाचे फलंदाज बाद होत गेले. किरण नवगिरे हिने फलंदाजीचा क्रम बदलला असला तरी धावांचा दुष्काळ कायम राहिला. किरण नवगिरे शून्यावर बाद झाली. जॉर्जिया व्होल हिने ३३ चेंडूत ५५ धावांची शानदार खेळी केली. तिने १२ चौकार मारले.
कर्णधार दीप्ती शर्मा हिने दोन चौकारांसह २५ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. अन्य फलंदाज झटपट बाद झाले. वृंदा दिनेश (१०), चिनेल हेन्री (६), श्वेता सेहरावत (०), उमा छेत्री (१), सोफी एक्लेस्टोन (१६) यांनी निराशा केली.
मुंबई इंडियन्सच्या अमेलिया केर हिने ३८ धावांत पाच विकेट घेत सामना गाजवला. यंदाच्या हंगामात पाच बळी घेणारी ही अमेलिया केर ही पहिली गोलंदाज ठरली आहे. हेली मॅथ्यूज हिने २५ धावांत दोन गडी टिपले. नॅट सायव्हर ब्रंट ९१-१६), पारुनिका सिसोदिया (१-२१) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.