
नॉकआउट लढतीत न्यूझीलंड संघ वरचढ
दुबई ः आयसीसीच्या नॉकआऊट सामन्यात भारतीय संघाचे न्यूझीलंड संघाविरुद्धचे रेकॉर्ड चांगले नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर न्यूझीलंड संघाला हरवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत हरलेला नाही हे रेकॉर्ड भारतीय संघाचे मनोबल वाढवणारे आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध मानसिकदृष्ट्या आघाडीवर असेल. याचे कारण म्हणजे आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये भारताने न्यूझीलंडवर मिळवलेला विजय. एकदिवसीय विश्वचषक असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कधीही न्यूझीलंड संघाविरुद्ध हरलेला नाही.
२०२३ च्या विश्वचषकात भारताने सुपर १० आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडला हरवले आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट सामन्यातही रोहितच्या संघाने न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपराजित राहणे आणि अंतिम फेरीत पोहोचणे त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढेल. तथापि, आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड हे जेतेपदाच्या लढतीत एकमेकांसमोर येण्याची ही तिसरी वेळ असेल. वस्तुस्थिती अशी आहे की भारताला आतापर्यंतच्या गेल्या दोन विजेतेपद लढतींमध्ये न्यूझीलंडला हरवता आलेले नाही. रविवारी दुबईमध्ये, भारतीय संघाला २००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल.
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव
आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत भारत आणि न्यूझीलंड चार वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये न्यूझीलंडने तीन वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने एकदा विजय मिळवला आहे, परंतु शेवटचा विजय भारताला मिळाला होता, जेव्हा त्यांनी २०२३ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत केले होते. दुबईमध्ये खेळण्याचा भारतीय संघाला फायदा आहे. दुबई आणि भारतीय खेळपट्ट्या बऱ्याच प्रमाणात सारख्या आहेत. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी या खेळपट्टीशी स्वतःला चांगले जुळवून घेतले आहे.
विराट-शमीची उत्कृष्ट कामगिरी
अंतिम फेरीत सर्वांच्या नजरा भारतीय फिरकीपटूंवर असतील, पण असे दोन खेळाडू आहेत ज्यांनी २०२३ च्या विश्वचषकात एकट्याने न्यूझीलंडचा पराभव केला. हे दोन्ही खेळाडू सध्याही उत्तम फॉर्ममध्ये आहेत. हे आहेत विराट कोहली आणि मोहम्मद शमी. २०२३ मध्ये झालेल्या गट सामन्यात शमीने ५४ धावा देत पाच विकेट्स घेतल्या आणि विराटने या सामन्यात १०४ चेंडूत ९५ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. हे दोन्ही खेळाडू उपांत्य फेरीत खेळले आहेत. शमीने ५७ धावांत सात बळी घेत आपली सर्वोत्तम कामगिरी केली तर विराटने ११३ चेंडूंत ११७ धावांची संस्मरणीय खेळी केली. २०२३ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यात शमीने १२ विकेट्स घेतल्या.
अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन पासून सावध राहावे लागेल. विल्यमसन याने भारताविरुद्ध ८१ धावा केल्या आणि उपांत्य सामन्यात त्याने आफ्रिकेविरुद्ध १०२ धावा केल्या आहेत. भारताने त्यांचे सर्व चॅम्पियन्स ट्रॉफी सामने दुबईत खेळल्यामुळे तेथील परिस्थिती बद्दल खरोखर स्पष्टता आहे असा विल्यमसनचा विश्वास आहे. असे असूनही, त्याचा संघ रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे असे तो म्हणाला.
खेळपट्टीशी जुळवून घ्यावे लागेल : रचिन रवींद्र
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात १०८ धावा करणारा सलामीवीर रचिन रवींद्रचा असा विश्वास आहे की भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याच्या संघाला दुबईच्या अज्ञात खेळपट्टीशी जुळवून घ्यावे लागेल. आम्हाला दुबईच्या खेळपट्टी बद्दल जास्त माहिती नाही. आम्ही भारताविरुद्ध एक सामना खेळलो आणि तेव्हा चेंडू खूप वळत होता, तर दुसऱ्या सामन्यात चेंडू जास्त वळत नव्हता असे रचिन रवींद्र म्हणाला.