
चंदीगड ः इशिता खळे (३-४) व उत्कर्षा कदम (३-२०) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्र महिला संघाने बीसीसीआयतर्फे आयोजित अंडर २३ एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत नागालँड महिला संघावर दहा विकेट राखून दणदणीत विजय संपादन केला.

ताऊ देवी लाल मैदानावर महाराष्ट्र व नागालँड संघात सामना झाला. नागालँड महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५.४ षटकात सर्वबाद ७९ धावा काढल्या. महाराष्ट्र संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत नागालँड संघाला ७९ धावसंख्येवर रोखले. अलेमिएन्ला हिने सर्वाधिक नाबाद २५ धावांचे योगदान दिले. ज्योती (११) व मेरेनसोला (१८) यांना धावांचा दुहेरी आकडा गाठण्यात यश आले. अन्य फलंदाज झटपट बाद झाले.
महाराष्ट्र महिला संघाकडून इशिता खळे हिने अवघ्या चार धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. उत्कर्षा कदम हिने २० धावांत तीन गडी बाद केले. पठारे (१-११), ज्ञानेश्वरी पाटील (१-८), गायत्री सुरवसे (१-१०), खुशी मुल्ला (१-२०) यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
महाराष्ट्र महिला संघासमोर विजयासाठी फक्त ८० धावांचे लक्ष्य होते. ईश्वरी अवसरे (नाबाद ३५) आणि खुशी मुल्ला (नाबाद ४२) यांनी आक्रमक फलंदाजी करत ७.१ षटकात महाराष्ट्र संघाला दहा विकेट राखून विजय मिळवून दिला. ईश्वरी हिने १९ चेंडूत ३५ धावा काढल्या. तिने एक षटकार व पाच चौकार मारले. खुशी मुल्ला हिने आठ चौकारांसह ४२ धावा फटकावल्या.