
हरलीन देओलच्या तुफानी फलंदाजीने गुजरातचा रोमांचक विजय, मेग लॅनिंगची ९२ धावांची खेळी व्यर्थ
लखनौ : हरलीन देओलच्या स्फोटक नाबाद ७० धावांच्या खेळीच्या बळावर गुजरात जायंट्स संघाने आघाडीवर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघावर पाच विकेट राखून विजय नोंदवत गुणतालिकेत आठ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. गुजरातच्या विजयाने यूपी वॉरियर्स संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
गुजरात जायंट्स संघासमोर विजयासाठी १७८ धावांचे आव्हान होते. गुजरात संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. शिखा पांडे हिने दयालन हेमलता हिला (१) दुसऱ्या षटकात बाद करुन पहिला धक्का दिला. मात्र, त्यानंतर बेथ मुनी व हरलीन देओल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची आक्रमक भागीदारी करत डाव सावरला. ही जोडी धोकादायक ठरत असताना बेथ मुनी ३५ चेंडूत ४४ धावा काढून बाद झाली. तिने सहा चौकार मारले. मिन्नू मणी हिने तिची विकेट घेतली. शिखा पांडे हिने कर्णधार अॅशले गार्डनरला २२ धावांवर बाद करुन सामन्यात चुरस निर्माण झाली. गार्डनर हिने दोन उत्तुंग षटकार व एक चौकार मारला.
हरलीन देओल हिने आक्रमक अर्धशतक ठोकत सामन्यातील चुरस कायम ठेवली. मात्र, डिआंड्रा डॉटिन (२४) व फोबी लिचफिल्ड (०) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करुन जोनासेन हिने सामन्यातील रोमांच वाढवला. डॉटिन हिने अवघ्या १० चेंडूत २४ धावा फटकावत संघाला विजयासमीप आणले. तिने दोन षटकार व दोन चौकार मारले. परंतु, डॉटिन बाद झाल्यानंतर सामन्याचे चित्र पुन्हा बदलले. मोठा दबाव असताना काशवी गौतम हिने उत्तुंग षटकार ठोकत संघाला पुन्हा विजयासमीप आणले. त्यानंतर हरलीन देओल हिने अप्रतिम चौकार ठोकत संघाचा विजय निश्चित केला. काशवी गौतम हिने ३ चेंडूत ९ धावा फटकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हरलीन देओल हिने ४९ चेंडूत नाबाद ७० धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हरलीनच्या स्फोटक अर्धशतकी खेळीने गुजरात संघाने १९.३ षटकात दिमाखदार विजय साकारला.
दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखा पांडे हिने ३१ धावांत दोन गडी बाद केले. जेस जोनासेन हिने ३८ धावांत दोन बळी घेतले. मिन्नू मणी हिने १५ धावांत एक बळी मिळवला.
लॅनिंगची धमाकेदार फलंदाजी

कर्णधार मेग लॅनिंगच्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकात पाच बाद १७७ अशी भक्कम धावसंख्या उभारली. लॅनिंग आणि शेफाली वर्मा या सलामी जोडीने ९ षटकात ८३ धावांची भागीदारी करत संघाला शानदार सुरुवात करुन दिली. शेफाली वर्माला ४० धावांवर मेघना सिंग हिने क्लीन बोल्ड करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. शेफालीने २७ चेंडूंचा सामना करत तीन टोलेजंग षटकार व तीन चौकार ठोकले. त्यानंतर जोनासेन (९), जेमिमा रॉड्रिग्ज (४), अॅनाबेल सदरलँड (१४) या आक्रमक फलंदाजांना गुजरात संघाने लवकर बाद करण्यात यश मिळवले.
एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना कर्णधार लॅनिंग हिने दमदार फलंदाजी करत अवघ्या ५७ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. लॅनिंगच्या बहारदार खेळीमुळे दिल्ली संघाला १७७ धावसंख्या उभारता आली. तिने १५ चौकार व एक षटकार मारला. डॉटिन हिने तिला क्लीनबोल्ड केले. तिचे शतक अवघ्या आठ धावांनी हुकले. त्यानंतर मॅरिझॅन कॅप हिने नाबाद ७ तर सारा ब्राइस हिने नाबाद ६ धावा काढल्या.
गुजरात जायंटस संघाकडून मेघना सिंग हिने ३५ धावांत तीन विकेट घेतल्या. डिआंड्रा डॉटिन हिने ३७ धावांत दोन बळी घेतले.