
नवी दिल्ली यजमानपद भूषवेल; १२३० खेळाडू सहभागी होणार
नवी दिल्ली ः खेलो इंडिया पॅरा गेम्सचा दुसरा टप्पा २० ते २७ मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे सुरू होईल. या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सुमारे १२३० पॅरा खेळाडू सहभागी होतील.
या पॅरा खेळाडूंपैकी बरेच जण २०२४ च्या पॅरिस पॅरालिंपिक आणि २०२२ च्या चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समधील पदक विजेते आहेत. ते सहा स्पर्धांमध्ये भाग घेतील. पॅरा आर्चरी, पॅरा अॅथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, पॅरा पॉवरलिफ्टिंग, पॅरा शूटिंग आणि पॅरा टेबल टेनिस या प्रकारात खेळाडू सहभागी होतील.

पॅरा अॅथलेटिक्स, पॅरा तिरंदाजी आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित केले जातील, तर आयजी स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये पॅरा बॅडमिंटन आणि पॅरा टेबल टेनिस स्पर्धांचे आयोजन केले जाईल. केआयपीजी २०२५ मध्ये भाग घेणाऱ्या प्रमुख पॅरा खेळाडूंमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते हरविंदर सिंग (तिरंदाजी), धरमबीर (क्लब थ्रो) आणि प्रवीण कुमार (उंच उडी) यांचा समावेश आहे.
क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की, आपल्या पॅरा खेळाडूंची प्रगती ही मोठ्या प्रमाणात खेळाडूंसाठी एक मोठी प्रेरणा आहे. ‘आपण हे करू शकतो’ ही वृत्ती खरोखरच प्रेरणादायी आहे आणि मला खात्री आहे की आगामी खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये आपल्याला उत्तम कामगिरी पाहायला मिळेल.
विशेष ऑलिम्पिक
इटलीतील ट्यूरिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड हिवाळी खेळांमध्ये भारत आपल्या सुवर्णपदकांच्या संख्येत सुधारणा करेल असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. २०१७ मध्ये ऑस्ट्रियामध्ये झालेल्या विशेष ऑलिम्पिक हिवाळी खेळांसाठी भारत ४९ सदस्यीय संघ पाठवला होता. त्यावेळी भारताने ३७ सुवर्णांसह ७३ पदके जिंकली होती.
भारतीय खेळाडू सहा स्पर्धांमध्ये भाग घेतील. त्यात अल्पाइन स्कीइंग, क्रॉस-कंट्री स्कीइंग, फ्लोअर बॉल, शॉर्ट स्पीड स्कीइंग, स्नो बोर्डिंग आणि स्नो शूइंग या प्रकारांचा समावेश आहे. भारतीय पथकात ३० खेळाडू, तीन अधिकारी आणि १६ सपोर्ट स्टाफ आहेत. ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात मांडवीय म्हणाले की, मला या खेळाडूंमध्ये खूप उत्साह दिसत आहे. गेल्या आवृत्तीत भारताने ३७ सुवर्णपदके जिंकली होती आणि यावेळी मला विश्वास आहे की आपण अधिक चांगली कामगिरी करू.