
बिहार राज्यातील राजगीर शहरात १ ते १३ जून या कालावधीत आयोजन
नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने भारताला महिला कबड्डी विश्वचषक २०२५चे यजमानपद अधिकृतपणे जाहीर केले आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १ ते १३ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
बिहार राज्यातील राजगीर या ऐतिहासिक शहरात महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष विनोद कुमार तिवारी म्हणाले की, भारत हे कबड्डीचे जन्मस्थान आहे आणि राजगीरमध्ये या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन केल्याने क्रीडा जगतात एक नवीन अध्याय जोडला जाईल. आम्हाला खात्री आहे की ही स्पर्धा महिला कबड्डीला जागतिक स्तरावर नवीन उंचीवर घेऊन जाईल.
या स्पर्धेत फक्त आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनशी संलग्न राष्ट्रीय कबड्डी संघटना, फेडरेओशनमधील संघ सहभागी होऊ शकती. इच्छुक संघांना त्यांची नोंदणी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत करता येईल.
या स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंचे वजन ७५ किलो किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. प्रत्येक संघ जास्तीत जास्त १४ खेळाडू, २ प्रशिक्षक, १ व्यवस्थापक आणि १ तांत्रिक अधिकारी नोंदणी करू शकतो. सामने सिंथेटिक मॅटवर खेळवले जातील आणि खेळाडूंना विशेष शूज घालावे लागतील.
आयोजन समितीच्या सुविधा
आयोजन समिती प्रत्येक संघातील १६ सदस्यांसाठी मोफत जेवण, निवास आणि वाहतुकीची व्यवस्था करेल. याव्यतिरिक्त, स्पर्धेच्या ठिकाणी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा देखील उपलब्ध असतील. तथापि, आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने स्पष्ट केले आहे की, खेळाडू स्वतःच्या जोखमीवर खेळतील आणि कोणत्याही दुखापती किंवा नुकसानासाठी आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
कडक शिस्तीचे नियम
स्पर्धेदरम्यान शिस्त राखण्यासाठी आयकेएफ कार्यकारी मंडळ कठोर उपाययोजना करेल. खेळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडू किंवा संघांवर निलंबन किंवा दंड आकारला जाऊ शकतो. कोणताही संघ सामना संपल्यानंतर एका तासाच्या आत १०० अमेरिकन डॉलर्स शुल्क आकारून निषेध नोंदवू शकतो.
महिला कबड्डीला जागतिक व्यासपीठ मिळेल
महिला कबड्डीच्या जागतिक विस्तारात ही स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावेल असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही वर्षांत, कबड्डीने आशिया, युरोप आणि आफ्रिकेत आपली लोकप्रियता वाढवली आहे. आयोजन समितीच्या एका सदस्याने सांगितले की, “आम्ही राजगीरमध्ये ही ऐतिहासिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. आमचे उद्दिष्ट केवळ यशस्वी स्पर्धा आयोजित करणे नाही तर महिला कबड्डीसाठी एक नवीन जागतिक मानक स्थापित करणे आहे.