
दुबई ः चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पहिलाच सामना खेळताना वरुण चक्रवर्ती याने न्यूझीलंडचे पाच फलंदाज बाद केले होते. या कामगिरीने वरुणची जोरदार चर्चा होत आहे. आता अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा भारतासमोर उभा ठाकला आहे. साहजिकच वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताचा माजी सलामीवीर मुरली विजयने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीचे कौतुक केले आहे. मुरली म्हणाला की, कॅरम बॉल आणि फ्लिपरवरील त्याच्या नियंत्रणामुळे, हा गूढ फिरकी गोलंदाज जागतिक दर्जाचा गोलंदाज बनण्याच्या मार्गावर आहे.
वरुण चक्रवर्तीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात सात विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या गट फेरीतील सामन्यात घेतलेल्या पाच विकेट्सचाही समावेश आहे. रविवारी भारताचा अंतिम सामना न्यूझीलंडशी होईल ज्यामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असेल.
विजयने पीटीआयला सांगितले की, मला वाटते की तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. तो एकदिवसीय आणि टी २० मध्ये जागतिक दर्जाचा गोलंदाज बनण्याच्या जवळ आहे कारण कॅरम बॉल आणि फ्लिपरवर पूर्ण नियंत्रण ठेवून गोलंदाजी करणारे फार कमी गोलंदाज आहेत. त्याला गोलंदाजी करताना पाहणे आनंददायी असते.
मुरली विजयचा असा विश्वास आहे की नियमितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यामुळे येणारी ही एक नैसर्गिक प्रगती आहे. मुरली म्हणाला, “मला वाटते की ही एक नैसर्गिक प्रगती आहे कारण आता मी ज्याबद्दल बोलत आहे त्याला पूर्वीपेक्षा जास्त लय मिळाली आहे. आयुष्य असेच चालते. भारतासाठी खेळणे आपल्या सर्वांसाठी खास आहे आणि एकदा संधी मिळाली की, तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असतो. तुम्हाला या संधींचा फायदा घ्यायचा आहे आणि प्रभाव पाडायचा आहे. वरुणने त्याच्या छोट्या कारकिर्दीत आतापर्यंत हेच केले आहे. आशा आहे की त्याला भारतीय क्रिकेट संघासोबत दीर्घ कारकिर्द मिळेल. माझ्याकडून त्याला शुभेच्छा.
भारताच्या टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अलीकडेच सांगितले की चक्रवर्ती आता मानसिकदृष्ट्या मजबूत खेळाडू बनला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तो शांत राहतो.