
एमसीए महिला क्रिकेट ः सांडभोर सामनावीर
कोल्हापूर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत बीड महिला संघाने सिंधुदुर्ग महिला संघावर पाच विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यात एक्का सांडभोर हिने सामनावीर किताब पटकावला.
शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज मैदानावर बीड व सिंधुदुर्ग सामना झाला. सिंधुदुर्ग महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सिंधुदुर्ग संघाने ३८.२ षटकात सर्वबाद २३० धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना बीड महिला संघाने ४१.५ षटकात पाच बाद २३१ धावा फटकावत पाच विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात सिंधुदुर्ग संघाच्या जागृती हिने धमाकेदार शतक झळकावले. जागृतीने १०५ चेंडूत १०३ धावा काढल्या. त्यात तिने १७ चौकार मारले. बीडच्या स्नेहा जगताप हिने ७४ चेंडूत ६२ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. तिने आठ चौकार मारले. प्राजक्ता गुरव हिने ४७ चेंडूत ६१ धावांचे योगदान दिले. तिने ११ चौकार मारले. बीडच्या एक्का सांडभोर हिने ३७ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. सरस्वती कोकरे हिने १८ धावांत तीन गडी बाद केले. स्नेहा जगताप हिने ३४ धावांत तीन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. बीड महिला संघाला माही परमार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
संक्षिप्त धावफलक ः सिंधुदुर्ग महिला संघ ः ३८.२ षटकात सर्वबाद २३० (जागृती १०३, नीलम तावडे १४, प्राजक्ता गुरव ६१, इतर ३२, एक्का सांडभोर ४-३७, स्नेहा जगताप ३-३४, विशाखा इंगळे १-४३, ऋतुजा सुखसारे १-२५) पराभूत विरुद्ध बीड महिला संघ ः ४१.५ षटकात पाच बाद २३१ (स्नेहा जगताप ६२, ऋतुजा सुखसारे ५२, एक्का सांडभोर नाबाद ३८, ज्ञानेश्वरी तांबे नाबाद ३५, इतर ३६, सरस्वती कोकरे ३-१८, प्राजक्ता गुरव १-५८). सामनावीर ः एक्का सांडभोर.