
समृद्धी, श्वेता पवारची लक्षवेधक कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत धाराशिव महिला संघाने स्टार महिला संघावर २३६ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. या सामन्यात धाराशिव संघाच्या श्वेता पवार हिने सामनावीर किताब मिळवला.
विराग क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. धाराशिव महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ५० षटकात आठ बाद ३१० असा धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येचा पाठलाग करताना स्टार महिला संघ २१.३ षटकात अवघ्या नऊ बाद ७४ धाव काढू शकला. धाराशिव महिला संघाने तब्बल २३६ धावांनी विजय साकारला.
या लढतीत धाराशिवच्या समृद्धी हिने ५८ चेंडूत ८३ धावांची दमदार खेळी साकारली. तिने चार उत्तुंग षटकार व दहा चौकार मारले. दिया इन्ना हिने ३३ चेंडूत ४० धावा फटकावल्या. तिने सात चौकार मारले. राजनंदिनी गुंड हिने पाच चौकारांसह ३८ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत श्वेता पवार हिने सात धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. प्रिया कोकरे हिने ४९ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः धाराशिव महिला संघ ः ५० षटकात आठ बाद ३१० (अनिशा बिक्कड १७, श्वेता पवार ३६, समृद्धी ८३, राजनंदिनी गुंड ३८, दिया इन्ना ४०, मृदुला आचार्य ३४, आर्या शिंदे नाबाद २३, सौम्या पांडे नाबाद १०, इतर २१, प्रिया कोकरे ४९, माधवी पंचावरे १-७६, तन्वी खलाडकर १-५३, गौरवी गौली १-२५) विजयी विरुद्ध स्टार महिला संघ ः २१.३ षटकात नऊ बाद ७४ (प्रिया कोकरे २३, साक्षी पाटील ११, तन्वी खलाडकर ७, मोक्ष चौधरी ६, इतर २३, श्वेता पवार ४-७, सौम्या पांडे १-२८, सायली पोळ १-२०, अर्पिता नायकवाडी १-२). सामनावीर ः श्वेता पवार.