
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट ः निकित चौधरी, नितीन भुईगळ, अशोक शिंदे, मयूर अग्रवालची धमाकेदार फलंदाजी
छत्रपती संभाजीनगर ः लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत डीएफसी श्रावणी संघाने श्लोक वॉरियर्स संघावर १०७ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात निकित चौधरी याने सामनावीर किताब पटकावला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. श्लोक वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय श्लोक वॉरियर्स संघाला प्रचंड महागात पडला. कारण डीएफसी श्रावणी संघाने २० षटकात पाच बाद २५४ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व मिळवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्लोक वॉरियर्स संघ २० षटकात आठ बाद १४७ धावा काढू शकला. त्यामुळे डीएफसी श्रावणी संघाने तब्बल १०७ धावांनी मोठा विजय संपादन केला.

या सामन्यात डीएफसी श्रावणी संघाच्या निकित चौधरी, नितीन भुईगळ आणि अशोक शिंदे यांनी धमाकेदार फलंदाजी करत अर्धशतके ठोकली. निकित चौधरी याने ५१ चेंडूत ८७ धावांची बहारदार खेळी केली. त्याने चार उत्तुंग षटकार व बारा चौकार मारले. नितीन भुईगळ याने अवघ्या २९ चेंडूत ८५ धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्याने षटकारांचा पाऊस पाडला. नितीनने तब्बल १० षटकार ठोकले व चार चौकार मारले. अशोक शिंदे याने ३१ चेंडुत ५८ धावांची वेगवान खेळी केली. त्याने चार टोलेजंग षटकार व सहा चौकार मारले. श्लोक संघाच्या मयूर अग्रवाल याने ३४ चेंडूत ५१ धावांची दमदार खेळी केली. त्याने पाच उत्तुंग षटकार व दोन चौकार मारले. गोलंदाजीत पंकज याने २४ धावांत तीन गडी बाद केले. निलेश गवई याने १८ धावांत दोन विकेट घेतल्या. अमान शेख याने २६ धावांत दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक ः डीएफसी श्रावणी संघ ः २० षटकात पाच बाद २५४ (निकित चौधरी ८७, अशोक शिंदे ५८, नितीन भुईगळ नाबाद ८५, अमान शेख १४, जेके १-३४, शुभम अग्रवाल १-३३, आमेर बदाम १-४४, धर्मेंद्र वासानी १-३७) विजयी विरुद्ध श्लोक वॉरियर्स ः २० षटकात आठ बाद १४७ (प्रवीण क्षीरसागर ६, सय्यद फरहान ४५, जेके १५, मयूर अग्रवाल ५१, राहुल रगडे नाबाद ८, प्रमोद उघाडे नाबाद ९, इतर १२, पंकज ३-२४, अमान शेख २-२६, निलेश गवई २-१८, गणेश ठाकूर १-२४). सामनावीर ः निकित चौधरी.