
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट ः शतकवीर इंद्रजीत उढाण सामनावीर, अतुल वालेकर, विराज चितळे, सिद्धांत पटवर्धन चमकले
छत्रपती संभाजीनगर ः लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत राऊडी सुपर किंग्ज संघाने नॉन स्ट्रायकर्स संघावर १० विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. शतकवीर इंद्रजीत उढाण सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. नॉन स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवताना नॉन स्ट्रायकर्स संघाने २० षटकात नऊ बाद १८२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. १८३ धावांचे विजयी लक्ष्य असताना राऊडी सुपर किंग्ज संघाने १८ षटकात बिनबाद १८३ धावा फटकावत दहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला.

या सामन्यात राऊडी सुपर किंग्ज संघाच्या इंद्रजीत उढाण याने अवघ्या ५४ चेंडूत नाबाद ११० धावांची वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. इंद्रजीत याने या धमाकेदार शतकी खेळीत चार उत्तुंग षटकार व १५ चौकार ठोकले. अतुल वालेकर याने ५५ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी करुन इंद्रजीतला सुरेख साथ दिली. अतुलने तीन उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. नॉन स्ट्रायकर्स संघाकडून सिद्धांत पटवर्धन याने ४३ चेंडूत ६३ धावा काढल्या. त्याने तीन टोलेजंग षटकार व सात चौकार मारले. गोलंदाजीत विराज चितळे याने ३४ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. इंद्रजीत उढाण याने २४ धावांत दोन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली. सय्यद जलिस याने ३३ धावांत एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक ः नॉन स्ट्रायकर्स संघ ः २० षटकात नऊ बाद १८२ (इरफान पठाण २४, सिद्धांत पटवर्धन ६३, आसिफ खान २३, गिरीश खत्री ७, वसीम शेख ९, लहू लोहार नाबाद १५, जी सचिन १५, इतर २२, विराज चितळे ३-३४, इंद्रजीत उढाण २-२४, कैलास शेळके १-२७, सय्यद जलिस १-३३, निनाद खोचे १-११) पराभूत विरुद्ध राऊडी सुपर किंग्ज ः १८ षटकात बिनबाद १८३ (इंद्रजीत उढाण नाबाद ११०, अतुल वालेकर नाबाद ६३, इतर १०). सामनावीर ः इंद्रजीत उढाण.