
कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर ः जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे नावलौकिक केलेल्या महिला खेळाडू व प्रशिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या वतीने विद्यापीठाच्या यशवंत महिला वसतिगृहाच्या पटांगणात नव्याने तयार करण्यात आलेल्या बास्केटबॉल खेळाच्या मैदानाचे तसेच बास्केटबॉल कोर्ट व स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कुलसचिव प्रोफेसर डॉ प्रशांत अमृतकर, प्र-क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, मुख्य रेक्टर डॉ सतीश दांडगे, रेक्टर डॉ गौरी कल्लावार, रेक्टर डॉ कावेरी लाड, व क्रीडा विभागातील बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश कड, व्हॉलिबॉल प्रशिक्षक अभिजित दिक्कत, फुटबॉल प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी आदींची उपस्थिती होती.

कुलगुरू प्रोफेसर डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते मैदानाची विधिवत नारळ फोडून पूजा करून व बास्केटबॉल रिंगमध्ये टाकून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी खेळामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या महिला खेळाडू व प्रशिक्षकांचा कुलगुरूंच्या हस्ते नारीशक्तीचे प्रतीक स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात. यामध्ये जालन्याच्या प्राचार्या डॉ अलका मंडलिक, हिमकन्या डॉ. मनीषा वाघमारे, राष्ट्रीय खेळाडू संजना जगताप, क्रीडा प्राध्यापिका डॉ संध्या जगताप, डॉ सीमा मुंढे, डॉ नेहा माने, योगा शिक्षिका छाया मिरकर, दिव्यांग खेळाडूंसाठी झटणाऱ्या स्मिता पठारे, बास्केटबॉल प्रशिक्षिका रागिणी कुसळे आदींचा गौरव करण्यात आला.
विद्यापीठ वसतिगृहातील महिला विद्यार्थिनींसाठी लवकरच ओपन जिम उभारणार असल्याचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी सांगितले. तसेच सर्व विद्यार्थिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संदीप जगताप यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीतसिंग दिक्कत यांनी केले. गणेश कड यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ मसूद हाश्मी, डॉ पंढरीनाथ रोकडे, प्रभा भिंगारे, वर्षा अहिरे, मोहन वाहिलवर, संजय लांब, अशोक गांगुले, डॉ लक्ष्मण जाधव आदींनी पुढाकार घेतला.