
लखनौ : जॉर्जिया वोलच्या शानदार नाबाद ९९ धावांच्या बळावर यूपी वॉरियर्स संघाने गतविजेत्या आरसीबी संघाचा १२ धावांनी पराभव केला. रिचा घोषची आक्रमक अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. या स्पर्धेत यूपी संघाने केवळ दोन विजय नोंदवले आणि ते दोन्ही आरसीबी संघाविरुद्धचे आहेत हे विशेष. आरसीबी संघाचा हा सलग पाच पराभव आहे.
आरबीसी संघासमोर विजयासाठी २२६ धावांचे आव्हान होते. कर्णधार स्मृती मानधना (४) लवकर बाद झाली. मेघना (२७), एलिस पेरी (२८) यांनी आक्रमक खेळी केली. परंतु, फटकेबाजीच्या प्रयत्नात त्यांनी आपल्या विकेट गमावल्या. रिचा घोष हिने ३३ चेंडूत ६९ धावांची झुंजार खेळी केली. तिने पाच उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. रिचा बाद झाल्यानंतर त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. स्नेह राणा (सहा चेंडूत २६), राघवी बिस्ट (१४), कनिका आहुजा (८), जॉर्जिया वेअरहॅम (१७), शार्लोट डीन (९) यांनी आपले योगदान दिले. आरसीबीने १९.२ षटकात सर्वबाद २१३ धावा काढल्या. सोफी एक्लेस्टोन हिने २५ धावांत तीन विकेट तर दीप्ती शर्मा हिने ५० धावांत तीन विकेट घेतल्या.
यूपी वॉरियर्स संघाची विक्रमी धावसंख्या
यूपी वॉरियर्सने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ऐतिहासिक खेळी केली. जॉर्जिया वोलच्या ९९ धावांच्या शानदार खेळीच्या मदतीने यूपी संघाने महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली. यूपीने २० षटकांत ५ गडी गमावून २२५ धावा केल्या.
आरसीबीच्या कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो उत्तर प्रदेशच्या फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. उत्तर प्रदेशकडून डावाची सुरुवात करताना ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वोल यांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. ३९ धावांवर मानधनाने हॅरिसला धावबाद केले.
जॉर्जिया वॉलचे शतक हुकले
जॉर्जिया वॉलने किरण नवगिरेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर, हेन्री हिने तिला चांगली साथ दिली. जॉर्जिया शतकाकडे वाटचाल करत होती पण दुर्दैवाने ती या संस्मरणीय खेळीचे शतकात रूपांतर करू शकली नाही. ती ९९ धावांवर नाबाद राहिली. ५६ चेंडूंच्या या खेळीत त्याने १७ चौकार आणि १ षटकार मारला. किरण नवगिरेने १६ चेंडूत ४६ धावा फटकावल्या. तिने पाच षटकार व दोन चौकार मारले.
जॉर्जिया वॉलने खेळलेली ९९ धावांची खेळी ही महिला प्रीमियर लीग २०२५ मधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. याआधी बेथ मूनीची ९६ धावांची खेळी सर्वात मोठी होती. या हंगामात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला शतक करता आलेले नाही, आज जॉर्जियालाही ते १ धावेने हुकले.
चार्ली डीन सर्वात महागडी गोलंदाज
आरसीबीसाठी सर्वात महागडी गोलंदाज चार्ली डीन ठरली. तिने ४ षटकांत ४७ धावा दिल्या आणि १ विकेट घेतली. किम गार्थने ४ षटकांत ४२ धावा दिल्या, रेणुका सिंगने ३ षटकांत ४२ धावा दिल्या. दोघांनाही एकही विकेट मिळाली नाही. जॉर्जिया वेअरहॅमने ४ षटकांत ४३ धावा देत २ बळी घेतले. स्नेह राणाने फक्त १ षटक टाकले आणि १३ धावा दिल्या. एलिस पेरीने ४ षटकांत ३५ धावा दिल्या. या लढतीत आरसीबीचे सर्व गोलंदाज महागडे ठरले.
महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात यूपी वॉरियर्स संघाने सर्वाधिक धावसंख्या केली आहे. यापूर्वी हा विक्रम दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नावावर होता. त्यांनी ५ मार्च २०२३ रोजी बंगळुरूविरुद्ध २२३ धावसंख्या उभारली होती.