जलतरण साक्षरता व प्रशिक्षण शिबिरास मोठा प्रतिसाद  

  • By admin
  • March 9, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

जागतिक महिला दिनानिमित्त सिद्धार्थ जलतरण तलावावर आयोजन 

छत्रपती संभाजीनगर ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ ते १५ मार्च दरम्यान महानगरपालिकेच्या सहकार्याने व राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या वतीने आयोजित महिलांसाठी मोफत जलतरण साक्षरता व प्रशिक्षण शिबीरास मोठा प्रतिसाद लाभला आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित जलतरण साक्षरता व प्रशिक्षण शिबिरास शनिवारी महापालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलावावर सुरुवात झाली. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता सावळे-नवले यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, जलतरण साक्षरता अभियानाचा उद्देश हा नितांत सुंदर आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेऊन २००० शाळांना आवाहन केले आहे. या संकल्पने विस्तार इतका व्हावा की महानगरपालिकेला महिलांसाठी स्वतंत्र जलतरण तलाव बाधण्याची गरज पडावी आणि हे आगामी काळात शक्य आहे. राजेश भोसले हे काम अगदी झोकून देऊन करतात. या उपक्रमासाठी शुभेच्छा. 

जिल्हा परिषदेच्या उपशिक्षण अधिकारी गीता तांदळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जलतरण हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. तो प्रत्येक महिलेने आत्मसात करून घ्यावा व त्याचा सराव नियमित केल्यास महिलांच्या आरोग्या संबंधीच्या बऱ्याच समस्या सुटतील  असाच उपक्रम जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षिकांसाठी राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. हा उपक्रम हा ऐतिहासिक व अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेच्या एक क्रीडा शिक्षक राबवितो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

देवगिरी महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ सुलक्षणा जाधव म्हणाल्या की, आपल्या शहरातील महिला एनसीसी विंग असणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी या शिबिराचा लाभ घ्यावा. प्रत्येक महिलेला जलतरण साक्षर बनविण्याचे राजेश भोसले यांचे अभियान कौतुकास्पद आहे.

सिद्धार्थ जलतरण तलावाचे व्यवस्थापक अभय देशमुख म्हणाले की, जलतरण साक्षरतेच्या कार्या सोबत राजेश भोसले यांचे  पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम पण खूप मोठे आहे. राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन घराघरापर्यंत गेले पाहिजे ही काळाची गरज आहे. या सोबत प्राथमिक उपचारांची माहितीची जोड द्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक व पर्यावरण प्रेमी मधुकर वैद्य म्हणाले की, आज पुन्हा समाजामध्ये शामची आई निर्माण व्हावी. मोबाईल ऐवजी मुलांना व स्वतःला जलतरण साक्षर करून घ्यावे जेणे करून आरोग्य संस्कार रुजण्यास मदत होईल. 

महापालिकेचे सेवानिवृत्त उपायुक्त रवींद्र निकम म्हणाले की, राजेश भोसले यांचा नवनवीन संकल्पना राबविण्यात हातखंडा आहे. महिलांसाठी आयोजित जलतरण साक्षरता व प्रशिक्षण आयोजनामुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगरची ओळख ही भारतातील १०० टक्के जलतरण साक्षर जिल्हा म्हणून होईल याचा मला सार्थ अभिमान आहे व या मिशनचा मी एक हिस्सा आहे. या अभियानास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे प्रमुख व जलतरण प्रशिक्षक राजेश भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून जागतिक जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे व राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे प्रमुख जलतरण पटू व प्रशिक्षक राजेश भोसले यांनी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक जी श्रीकांत यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी या संकल्पनेचे महत्व, गांभीर्य तसेच ती काळाची गरज आहे हे समजून घेऊन महिला सभासदांना जलतरणाची आवड व सवय व्हावी म्हणून प्रथम सात दिवसांची मोफत प्रशिक्षणाची सवलत तर दिलीच पण ही सवय कायम राहावी म्हणून यापुढे नियमित प्रवेश घेणाऱ्या महिला सभासदांना फी मध्ये २० टक्के सुट सुद्धा दिली. आयुक्तांचा हा निर्णय दूरदृष्टीचा असल्याचे मत सुद्धा राजेश भोसले यांनी व्यक्त केले.

शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना जलतरण साक्षरतेची शपथ देण्यात आली. अंजूषा मगर, पौर्णिमा भोसले, वंदना वाघमोडे यांनी ही शपथ दिली. महिलांनी पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *