
महिला प्रीमियर लीग
लखनौ ः महिला प्रीमियर लीग स्पर्धेत यूपी वॉरियर्स संघाने गतविजेत्या आरसीबी संघाला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे आरसीबी संघ स्पर्धेतून बाहेर पडला. आता थेट अंतिम फेरी गाठण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ १० गुणांसह आघाडीवर आहे.
यूपी वॉरियर्सने आरसीबीचा १२ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या यूपी संघाने २२५ धावांचा विक्रम केला होता. ही महिला प्रीमियर लीग इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या देखील आहे. प्रत्युत्तरात, संपूर्ण आरसीबी संघ २१३ धावांवर सर्वबाद झाला. यूपी आणि आरसीबी हे दोन्ही संघ आता स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाणाऱ्या सर्व संघांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत.

महिला प्रीमियर लीगच्या स्वरूपानुसार पॉइंट टेबलमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांना बाद फेरीत प्रवेश मिळतो. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो, जो अद्याप निश्चित झालेला नाही. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स हे तीन संघ प्लेऑफ मध्ये पोहोचले आहेत.
दिल्लीचे सर्व सामने संपले आहेत, पण मुंबई इंडियन्सचे २ सामने शिल्लक आहेत. गुजरात जायंट्स संघाचाही एक सामना शिल्लक आहे. दिल्ली सध्या १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे.. परंतु, मुंबई आणि गुजरात दोघांनाही थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. जर मुंबईने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांना थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. त्याच वेळी, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांसाठी एलिमिनेटर सामने आयोजित केले जातात. एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टेबल टॉपवर असलेल्या संघाशी सामना करेल.
पॉइंट्स टेबलची सध्याची स्थिती
लीग टप्प्यात अजूनही २ सामने शिल्लक आहेत, ज्याचा महिला प्रीमियर लीग पॉइंट टेबलवर खोलवर परिणाम होऊ शकतो. जर आपण सध्याच्या परिस्थितीवर नजर टाकली तर, दिल्ली कॅपिटल्स १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे, लीग टप्प्यातील त्यांचे सर्व सामने खेळले गेले आहेत. गुजरात जायंट्सचा एक सामना शिल्लक आहे आणि सध्या ते ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्सचे २ सामने शिल्लक आहेत आणि त्यांचे फक्त ८ गुण आहेत, परंतु नेट रन-रेटच्या बाबतीत ते गुजरातपेक्षा मागे आहेत.