
जिल्हा क्रीडा संकुलात विविध स्पर्धांचे आयोजन, महिलांचा मोठा सहभाग
जळगाव ः जळगाव जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव जिल्हा महिला शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करुन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनात जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, गोळाफेक, सूर्यनमस्कार, चमचा लिंबू , संगीत खुर्ची, योगासन या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. चार वयोगटात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सद्गुरू भक्तराज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा भारती चौधरी, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ सोनल इंगळे, शिवछत्रपती पुरस्कारर्थी नेहा देशमुख, महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश जाधव, विभागीय शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, आंतरराष्ट्रीय योगा पंच डॉ अनिता पाटील, राज्य योगा क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी, क्रीडा अधिकारी डॉ सुरेश थरकुडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी माता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले. प्रत्येक क्रीडा प्रकारातील अनुक्रमे पहिल्या तीन विजयी स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे आयोजित विविध स्पर्धेसाठी पंच म्हणून व आयोजनासाठी जळगाव जिल्हा महिला शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघांच्या पदाधिकारी मुख्याध्यापिका कांचन नारखेडे, चारुशीला पाटील, जयश्री माळी, सरस्वती ढाके, समिधा सोवनी, प्रा शालिनी तायडे, विजया चौधरी, डॉ कांचन विसपुते, श्वेता कोळी, धनश्री सोनी यांनी काम पाहिले. त्याबद्दल त्यांचा तसेच नाशिक ते लेह लडाख अशी सायकल मोहीम पूर्ण करणाऱ्या कामिनी धांडे, ज्येष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू छाया तायडे, सोनल विचवेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
विभागीय क्रीडा शिक्षक महासंघांचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी गत वर्षी प्रमाणे यावर्षीही पारितोषिकसाठी भेटवस्तू दिल्या. आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कांचन विसपुते यांनी केले. समिधा सोवनी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी डॉ सुरेश थरकुडे यांचे सहकार्य लाभले.