
क्रीडावेध मुंबईचे अध्यक्ष व माजी खासदार मनोज कोटक यांचा पुढाकार
मुंबई ः क्रीडावेध मुंबईच्या माध्यमातून बृहन्मुंबई विभागातील विविध क्रीडा संघटनांना एकत्रित करुन बृहन्मुंबई विभागाचा क्रीडा विकास साध्य करण्याचा संकल्प माजी खासदार मनोज कोटक यांनी सोडला आहे.
विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बृहन्मुंबई विभागाच्या खेळाडू व प्रशिक्षक यांच्या क्रीडा कामगिरीचे अभिनंदन सन्मान सोहळ्याद्वारे करताना क्रीडा विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणे, क्रीडा क्षेत्रात दीर्घकाळ भरीव योगदान करणारे ज्येष्ठ प्रशिक्षक, संघटक, क्रीडा कार्यकर्ते यांचा गुणगौरव मुंबई क्रीडावेधतर्फे करण्याचा क्रीडावेध समितीचा मनोदय आहे.
कोणत्याही स्पर्धेत प्रथम तीन खेळाडूंना पदके तसेच रोख रकमेने सन्मानित करीत असताना त्यानंतरच्या क्रमांकावरील खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना अपयश पचवणे कठीण असते. त्यांची मेहनत पहिल्या तीन क्रमांकाच्या तुलनेत कमी असली तरी त्यात अनेक वेळा फारच थोडा फरक असल्याचे आढळून येते. म्हणूनच अशा खेळाडूंना प्रोत्साहित करुन त्यांची कामगिरी पुढील स्पर्धांत उंचावण्यासाठी त्यांना उत्तेजन देणे महत्त्वाचे आहे असे मत क्रीडावेध अध्यक्ष माजी खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केले आहे.
अशा उदयोन्मुख खेळाडूंसह क्रीडा क्षेत्रातील दीर्घ योगदानाची दखल न घेतलेले संघटक, प्रशिक्षक यांचाही यथोचित सन्मान करुन क्रीडा चळवळीचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न क्रीडावेधतर्फे केल्यास कदाचित पुढील ३-४ वर्षांत बृहन्मुंबई विभागाच्या क्रीडा कामगिरीचा आलेख उंचावेल असे म्हणणे उचित ठरेल. २९ ऑगस्ट २०२४ या राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पुरस्कार योजनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष मनोज कोटक यांनी क्रीडावेध समितीची स्थापना केली आहे.
क्रीडावेध ध्येय व उद्दिष्टांमध्ये उदयोन्मुख खेळाडू प्रोत्साहनात्मक योजना व क्रीडा समस्या निवारणासाठी धोरणात्मक नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार निवडक खेळांचे दोन प्रतिनिधी यांना निमंत्रित करुन क्रीडावेध समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रारंभी कबड्डी, खो-खो, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, महानगरपालिका क्रीडा विभाग, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कुस्ती, बॉक्सिंग, तलवारबाजी, थ्रोबॉल, ज्युदो, तायक्वांदो या निवडक खेळांच्या उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणारी योजना राबवताना क्रीडा संघटक, प्रशिक्षक, क्रीडा संस्था या क्रीडा विकासामधील महत्वाच्या घटकांचा समावेश केला आहे.
मुंबई शहर व उपनगर विभागातील उदयोन्मुख २ पुरुष व २ महिला खेळाडू आणि प्रदीर्घ सेवा देऊनही पुरस्कारापासून दूर असलेले ज्येष्ठ प्रशिक्षक, संघटक, कार्यकर्ता यांपैकी एक या निवड प्रणालीच्या आधारे १५ विविध खेळांच्या ९० खेळाडू व कार्यकर्ते या पहिल्या गुणगौरव सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. क्रीडा वेध मुंबई समितीत संजय सरदेसाई, गुरुनाथ मिठबावकर, डॉ महेंद्र चेंबूरकर आदींचा समावेश आहे.