
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट : डॉ सुनील काळे, डॉ कार्तिक बाकलीवाल, डॉ मयूर राजपूत, लक्ष्मण सूर्यवंशी यांची लक्षवेधक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने रोहन रॉयल्स संघावर आठ विकेट राखून मोठा विजय नोंदवत आगेकूच कायम ठेवली. या लढतीत डॉ सुनील काळे यांनी सामनावीर किताब संपादन केला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहन रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १७२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने १७.४ षटकात दोन बाद १७३ धावा फटकावत आठ गडी राखून सामना जिंकला.

या विजयात डॉ सुनील काळे व डॉ कार्तिक बाकलीवाल यांनी धमाकेदार अर्धशतके झळकावत मोलाचा वाटा उचलला. सुनील काळे याने ४० चेंडूत ६५ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्यात सुनील काळेने दोन षटकार व नऊ चौकार मारले. कार्तिक बाकलीवाल याने अवघ्या ३५ चेंडूत ५९ धावांची शानदार खेळी केली. तुफानी अर्धशतकात कार्तिक याने नऊ चौकार व एक षटकार मारला. रोहन रॉयल्स संघाकडून डॉ मयूर राजपूत याने २६ चेंडूत आक्रमक अर्धशतक ठोकले. त्याने ५० धावा फटकावताना सहा टोलेजंग षटकार मारुन मैदान गाजवले. तसेच त्याने दोन चौकारही मारले. गोलंदाजीत लक्ष्मण सूर्यवंशी याने तीन षटकात केवळ १३ धावा देत चार विकेट घेत सामना संस्मरणीय बनवला. सुनील काळे याने १४ धावांत दोन गडी बाद करुन अष्टपैलू योगदान दिले. रमेश साळुंके याने २४ धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : रोहन रॉयल्स संघ : २० षटकात नऊ बाद १७२ (सतीश भुजंगे ११, मिलिंद पाटील १६, सम्राट गुटे ६, डॉ मयूर राजपूत ५०, रोहन शाह २७, रोहन राठोड ७, राजेंद्र चोपडा ३४, डॉ संदीप सानप ५, इतर १५, लक्ष्मण सूर्यवंशी ४-१३, डॉ सुनील काळे २-१४, राजू परचाके १-२८, रमेश साळुंके १-२४, नितीन चव्हाण १-२६) पराभूत विरुद्ध मीनाक्षी इंडस्ट्रीज संघ : १७.४ षटकात दोन बाद १७३ (डॉ सुनील काळे ६५, डॉ कार्तिक बाकलीवाल ५९, संदीप फोके नाबाद ३३, पांडुरंग गाजे नाबाद १०, डॉ मयूर राजपूत १-३०, रोहन शाह १-३१). सामनावीर : डॉ सुनील काळे.