
आचल अग्रवाल, स्वंजली मुळे, संजीवनी पवारची लक्षवेधक कामगिरी
सांगली : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत डीव्हीसीए महिला संघाने पूना क्लब महिला संघावर तीन विकेट राखून विजय नोंदवला. या सामन्यात आचल अग्रवाल हिने सामनावीर किताब मिळवला.
अप्पासाहेब बिनराळे पब्लिक स्कूल मैदानावर हा सामना झाला. पूना क्लब महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकात सहा बाद २३४ धावा काढल्या. डीव्हीसीए महिला संघाने ३९.१ षटकात सात बाद २३५ धावा फटकावत तीन विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात आचल अग्रवाल हिने ६५ चेंडूत ६७ धावा काढल्या. आचलने १० चौकार मारले. स्वंजली मुळे हिने नऊ चौकारांसह ६५ धावांची शानदार खेळी केली. संजीवनी पवार हिने ४१ चेंडूत ५१ धावा फटकावल्या. तिने आठ चौकार मारले. गोलंदाजीत शलाका काणे हिने ५० धावांत तीन गडी बाद केले. सृष्टी भोईर हिने ६ धावांत दोन विकेट घेत आपला ठसा उमटवला. प्रणवी गाढवे हिने २८ धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : पूना क्लब महिला संघ : ४९ षटकात सहा बाद २३४ (ग्रिशा कटारिया २३, दृष्टी जोशी ४१, सानिया गावडे ५१, संजीवनी पवार ५१, मयुरी साळुंके १०, नव्या दुबे १३, शलाका काणे नाबाद २६, इतर १९, आर्या जांभुळकर १-३६, समिधा चौगले १-३२, आराध्या पवार १-५७) पराभूत विरुद्ध डीव्हीसीए महिला संघ : ३९.१ षटकात सात बाद २३५ (सुहानी कहांडळ १३, राशी व्यास ८, आचल अग्रवाल ६७, स्वंजली मुळे ६५, आर्या जांभुळकर १४, आराध्या पवार २१, इतर ४१, शलाका काणे ३-५०, सृष्टी भोईर २-६, ग्रिशा कटारिया १-३५). सामनावीर : आचल अग्रवाल.