
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट : सुदर्शन एखंडे, स्वप्नील खडसे, प्रदीप जगदाळे, विश्व शिनगारे चमकले
छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यू एरा संघाने साई श्रद्धा संघाचा २७ धावांनी पराभव करत आगेकूच कायम ठेवली. या लढतीत सुदर्शन एखंडे याने सामनावीर किताब पटकावला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. न्यू एरा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात तीन बाद २३७ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना साई श्रद्धा संघाने २० षटकात नऊ बाद २१० धावा काढल्या. विजयासाठी साई श्रद्धा संघाने जोरदार संघर्ष केला. मात्र, न्यू एरा संघाने २१० धावांवर रोखत २७ धावांनी सामना जिंकला.

या लढतीत स्वप्नील खडसे याने ४६ चेंडूत ८२ धावांची तुफानी अर्धशतकी खेळी साकारली. स्वप्नीलने चार उत्तुंग षटकार व दहा चौकार मारले. प्रदीप जगदाळे याने अवघ्या ३५ चेंडूत ५० धावांची चमकदार अर्धशतकी खेळी केली. प्रदीपने दोन षटकार व पाच चौकार मारले. विश्व शिनगारे याने २२ चेंडूत ४४ धावा फटकावल्या. त्याने पाच टोलेजंग षटकार मारत सामन्यात रंगत आणली. गोलंदाजीत सुदर्शन एखंडे याने २८ धावांत पाच विकेट घेत सामना गाजवला. संदीप खोसरे याने ५५ धावांत तीन बळी घेतले. विश्व शिनगारे याने ४२ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : न्यू एरा संघ : २० षटकात तीन बाद २३७ (प्रदीप जगदाळे ५०, स्वप्नील खडसे ८२, सुदर्शन एखंडे ८, रिझवान अहमद नाबाद ३३, मोहम्मद इम्रान नाबाद ४०, इतर २४, विश्व शिनगारे २-४२, सतीश काळुंके १-३४) विजयी विरुद्ध साई श्रद्धा संघ : २० षटकात नऊ बाद २१० (विनोद लंबे १९, सुनील पल्लोड २७, अमित पाठक ४१, निखिल कदम १९, कपिल पल्लोड ५, फुझैल सिद्दीकी ११, विश्व शिनगारे नाबाद ४४, मनोज चोबे नाबाद ३०, इतर १२, सुदर्शन एखंडे ५-२८, संदीप खोसरे ३-५५, मोहम्मद इम्रान १-१७). सामनावीर : सुदर्शन एखंडे.