
रोहित शर्मा, शुभमन गिलची शतकी भागीदारी निर्णायक
कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल विजयाचे हिरो
दुबई : टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून क्रिकेट विश्वात आपला दबदबा कायम ठेवला. २०१३ नंतर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली आहे. भारताने न्यूझीलंड संघावर चार विकेट राखून विजय साकारत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
भारतीय संघ सर्वाधिक तीनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. २०१३ मध्ये भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ही ट्रॉफी जिंकली होती. २५ वर्षांनंतर न्यूझीलंड व भारतीय संघ विजेतेपदाचा सामना खेळत होते. जुना हिशेब पूर्ण करत भारताने न्यूझीलंडला नमवत १२ वर्षांनी पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले आहे.

भारतीय संघासमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान होते. कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार शुभमन गिल या सलामी जोडीने १८.४ षटकात १०५ धावांची दमदार भागीदारी करुन विजयाचा पाया भक्कमपणे रचला. सँटनर याने शुभमनला ३१ धावांवर बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. पिलिप्स याने एका हाताने अप्रतिम झेल टिपल्याने गिलला पॅव्हेलियन मध्ये परतावे लागले. त्यानंतर अनुभवी फलंदाज विराट कोहली (१) बाद झाल्याने सामन्यात थोडी रंगत आली.
कर्णधार रोहित शर्मा याने या स्पर्धेतील त्याची सर्वोत्कृष्ट खेळी करताना ८३ चेंडूत ७६ धावांची धमाकेदार खेळी केली. रोहितने तीन उत्तुंग षटकार व सात चौकार मारले. रोहितचे हे ५८वे अर्धशतक ठरले. या खेळीत रोहितने ख्रिस गेल (३२) याचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला. रोहित बाद झाला तेव्हा भारताची स्थिती तीन बाद १२२ अशी झाली होती. रचिन रवींद्र याला षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित यष्टीचीत बाद झाला. एक खराब फटका मारुन रोहित बाद झाल्यानंतर स्टेडियममध्ये शांतता पसरली होती.

रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर याने ६२ चेंडूत ४८ धावा काढल्या. त्याला दोन जीवदाने लाभली. परंतु, तो त्याचा फायदा उठवू शकला नाही. अय्यर याने दोन षटकार व दोन चौकार मारले. अक्षर पटेल याने ४० चेंडूत २९ धावांची उपयुक्त खेळी केली. त्याने एक षटकार व एक चौकार मारला. हार्दिक पंड्या याने १८ चेंडूत १८ धावा काढत संघाला विजयासमीप आणले. त्याने एक षटकार व एक चौकार मारला. केएल राहुल याने ३३ चेंडूत ाबाद ३४ धावा फटकावत विजयात मोलाचा वाटा उचलला. राहुलने संयमी फलंदाजी करत एक षटकार व एक चौकार मारला. रवींद्र जडेजा याने ६ चेंडूत नाबाद ९ धावा काढत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारताने ४९ षटकात सहा बाद २५४ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला. न्यूझीलंडकडून मिशेल सँटरन (२-४६), मायकेल ब्रेसवेल (२-२८) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
एक विचित्र योगायोग
२०१३ मध्ये जेव्हा भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले तेव्हा भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहिला होता. त्याचप्रमाणे, आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्येही भारताने गट टप्प्यातील सर्व सामने जिंकले आहेत. आणखी एक मोठी समानता म्हणजे त्यावेळी रोहित शर्मा भारतीय संघासाठी ओपनिंग करत होता आणि आताही तो ओपनिंग बॅट्समनची भूमिका बजावत आहे. हे योगायोग इथेच थांबत नाहीत कारण १२ वर्षांपूर्वी फिरकी गोलंदाज भारतासाठी गेम चेंजर ठरले होते. त्यावेळी रवींद्र जडेजाने ५ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या आणि रविचंद्रन अश्विननेही एकूण ८ विकेट्स घेत कहर केला होता. यावेळी वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी विरोधी संघांवर कहर करत संघाला विजय मिळवून दिले.
कोहली अपयशी
२०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण करून देताना विराट कोहली भारतीय गट-स्टेज सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. टी २० स्वरूपात खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात कोहलीने उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध ५८ धावा आणि अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध ४३ धावा अशी महत्त्वाची खेळी खेळली. त्याचप्रमाणे, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या महान सामन्यात विराटने १०० धावांचे शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपांत्य फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांची खेळी खेळली होती. परंतु, अंतिम सामन्यात कोहली फक्त १ धाव काढून बाद झाला.