
१९.५ कोटी रुपयांची पारितोषिक रक्कम मिळाली
दुबई ः चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाला २.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे अंदाजे १९.५ कोटी रुपये मिळाले आहेत.
कर्णधार रोहित शर्माच्या शानदार फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या सामन्यापूर्वी रोहितच्या निवृत्तीबद्दल अटकळ होती पण त्याने त्याच्या परिचित फॉर्ममध्ये परतून टीकाकारांची तोंडे बंद केली. त्यांच्या नेतृत्वाखाली, २०२४ च्या टी २० विश्वचषकानंतर भारताने जिंकलेले हे दुसरे आयसीसी विजेतेपद आहे.
२००२ आणि २०१३ नंतर भारताने स्पर्धेत एकही सामना न गमावता तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकले. इतर कोणत्याही संघाने ही ट्रॉफी तीन वेळा जिंकलेली नाही. विजयी भारतावर पैशांचा पाऊस पडला आहे. भारतीय संघाला २.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे १९.५ कोटी रुपये मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेत गेल्या वेळेच्या तुलनेत ५३ टक्के वाढ केली होती.
न्यूझीलंड संघाला ९.७२ कोटी रुपये
विजेत्या संघाव्यतिरिक्त उपविजेत्या न्यूझीलंड संघाला सुमारे ९.७२ कोटी रुपये मिळाले, तर उपांत्य फेरीत बाहेर पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना ४.८६ कोटी रुपये मिळाले. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ६.९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६० कोटी रुपये) पर्यंत वाढली. मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम ही खेळात गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या स्पर्धांची जागतिक प्रतिष्ठा राखण्यासाठी आयसीसीची वचनबद्धता अधोरेखित करते, असे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
इतर संघांना किती पैसे मिळाले?
गट टप्प्यात जिंकणाऱ्या कोणत्याही संघाला ३० लाख रुपये बक्षीस रक्कम मिळाली. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना सुमारे ३ कोटी रुपये मिळाले, तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना सुमारे १.२ कोटी रुपये मिळाले. याशिवाय, या आयसीसी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना सुमारे १.०८ रुपये कोटींची रक्कम देण्यात आली.