
यजमान देश असूनही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व नव्हते, हे आकलनाच्या पलीकडे ः शोएब अख्तर
दुबई ः चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा पहिल्यापासून कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत राहिली आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी ट्रॉफी भारतीय संघाला प्रदान केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यजमान असूनही पाकिस्तानचा एकही प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित नव्हता. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. तसेच शोएब अख्तर याने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या समारोप समारंभात आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना मंचावर आमंत्रित न केल्याने वाद निर्माण झाला. एका सूत्राने सांगितले की, पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमैर अहमद हे मैदानावर उपस्थित होते. पण त्यांना समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. तो स्पर्धेचा संचालक देखील आहे.
पीसीबीचे अध्यक्ष दुबईला जाऊ शकले नाहीत
सूत्रांनी सांगितले की, ‘पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी गृहमंत्री म्हणून काही काम असल्याने दुबईला जाऊ शकले नाहीत, परंतु पीसीबीच्या सीईओंना अंतिम आणि बक्षीस वितरणात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, काही कारणास्तव किंवा काही गैरसमजामुळे, ज्या व्यासपीठावरून आयसीसी अध्यक्ष जय शाह, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव देवजीत सैकिया यांनी खेळाडूंना पदके, ट्रॉफी आणि जॅकेट दिले होते, त्या व्यासपीठावर त्यांना बोलावण्यात आले नाही. यजमान पाकिस्तानचा कोणताही प्रतिनिधी मंचावर नव्हता. पीसीबी हा मुद्दा आयसीसीसमोर उपस्थित करू शकते. सूत्रांनी सांगितले की कदाचित सीईओ अंतिम समारंभ आयोजित करण्यासाठी जबाबदार असलेल्या आयसीसी लोकांशी योग्यरित्या संवाद साधू शकले नाहीत आणि म्हणूनच त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमान म्हणून पाकिस्तानचा व्यासपीठावर कोणताही प्रतिनिधी नव्हता.
शोएब अख्तरने व्यक्त केली नाराजी
माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, ‘भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, पण अंतिम सामन्यानंतर पीसीबीचा कोणताही प्रतिनिधी नव्हता. पाकिस्तान यजमान होता. पीसीबीचा कोणीही तिथे का नव्हता हे मला समजले नाही. ट्रॉफी देण्यासाठी कोणीही का आले नाही, प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणीही का आले नाही? हे खरोखर माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. हे कसे शक्य आहे?? अंतिम फेरीत आणि बक्षीस वितरणात यजमान देशाचे प्रतिनिधित्व कुठे होते? तुम्ही याचा गांभीर्याने विचार करायला हवा. ते जागतिक रंगमंच होते. पीसीबी इथे असायला हवे होते, पण दुर्दैवाने मला कोणीही दिसले नाही. मला याबद्दल खूप वाईट वाटते.
हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा
बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी भारतीय खेळाडूंना पांढरे जॅकेट आणि सामना अधिकाऱ्यांना पदके प्रदान केली, तर आयसीसी अध्यक्ष शाह यांनी रोहित शर्माला ट्रॉफी प्रदान केली आणि भारतीय खेळाडूंना पदके प्रदान केली. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिला होता. पीसीबीने एका हायब्रीड मॉडेल पद्धतीला मान्यता दिली होती. त्यामुळे भारताला दुबईमध्ये त्यांचे सामने खेळण्याची परवानगी मिळाली होती.