
छत्रपती संभाजीनगर ः एमआयटी पॉलिटेक्निक रोटेगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर-पानसरे, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा आणि वैजापूर शहराच्या माजी नगराध्यक्षा आनंदी अन्नदाते उपस्थित होत्या. अश्विनी लाठकर-पानसरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्त्रियांमध्ये आकाश व्यापण्याची शक्ती असल्याचे सांगितले. आधुनिक काळात शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात त्यांचे वाढते योगदान ओळखून त्यांना पाठिंबा देण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. तसेच, स्त्रियांनी आत्मविकासाला प्राधान्य द्यावे यावर भर देताना, ग्रामीण समाजातील बदलत्या परिस्थितीत स्त्रियांची जबाबदारी आशादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
मंगल खिवंसरा त्यांनी स्त्री चळवळीतील मागील पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत राजा राममोहन रॉय व महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या कार्याला पुढे न्यायचे असल्याचे मत व्यक्त केले. जातीभेद नष्ट व्हावा व स्त्री-पुरुष समानता यावी यासाठी विविध संस्थांद्वारे आपण कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ७० हजार आदिवासींना जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. घरातील स्त्रीला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी सातबारावर तिचे नाव असावे यासाठी देखील त्यांनी आपला ठाम आग्रह व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे स्त्रियांवरील अन्याय वाढत असून, विशेषतः स्त्री भ्रूणहत्या प्रमाण चिंताजनक आहे. बालविवाह रोखण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्था प्रयत्नशील असल्या तरी त्यानंतर मुलींच्या शिक्षण व भविष्याबाबत पुरेशी काळजी घेतली जात नाही. तसेच, महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असून, यावर प्रतिबंध घालण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे, यावर विशेष भर दिला.
आनंदी अन्नदाते यांनी स्त्रियांमध्ये संघर्षाची जिद्द असणे आवश्यक असल्याचे सांगितले. अन्याय सहन करण्याऐवजी त्याविरुद्ध लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलींना सक्षम करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ यज्ञवीर कवडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना तंत्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नाहीतर आपल्याला फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव करून दिली. ग्रामीण भागात औद्योगिक क्षेत्राची वाढ होण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. एमआयटीचे डायरेक्टर डॉ निलेश पाटील यांनी मुलींना सर्व क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले आणि त्यांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे सुचवले.
वैजापूरचे शिक्षणविस्तार अधिकारी मनीष दिवेकर यांनी स्त्री ही घराच्या विकासाचा आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. संस्थेचे प्राचार्य प्रा किशोर पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रस्तावना सादर केली. ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाच्या संचालिका डॉ शकुंतला लोमटे यांनी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद वैजापूर परिसरातील जवळपास २०० शिक्षक-शिक्षिका तसेच एमआयटी पॉलिटेक्निक रोटेगाव येथील सुमारे ७०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुकारामवाडी केंद्र येथील सहाय्यक शिक्षक मनोज सोनवणे व प्रा विवेक जोशी यांनी केले. प्रा मनीषा जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ बाबासाहेब सोनवणे, एमआयटी छत्रपती संभाजीनगर आणि एमआयटी रोटेगाव येथील अकॅडमी डीन प्रा स्वप्निल पाठक, प्रशासकीय अधिकारी प्रा बाबासाहेब खरात, सर्व विभाग प्रमुख प्रा विजय तळेकर, प्रा विलास जाधव, प्रा सूर्यकांत जगताप, प्रा सत्येंद्र राम, प्रा निलेश सोनवणे व प्रा श्याम गाडेकर तसेच प्रा गणेश भिसे, प्रा किरण पाटील, प्रा दिगंबर आव्हाळे, प्रा अमोल निकम, प्रा अश्विनी राजपूत, प्रा दीपाली भालेकर, प्रा हरीश कुमावत, योगेश कलात्रे यांनी विशेष प्रयत्न केले.