
छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत फिट इंडिया पिंक सायक्लोथॉन आणि वॉकथॉन या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात ऊर्जादायी झुंबा सेशनने झाली. त्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. झुंबानंतर सायक्लोथॉन आणि वॉकथॉन आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये महिलांनी उत्साहाने भाग घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन साई केंद्राच्या उपसंचालक डॉ मोनिका घुगे, सहाय्यक संचालक सुमेध तरोडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच टूरिझम ऑफिसर नौमान खान व क्रीडा अधिकारी सय्यद जमशीद यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमात ५०० हून अधिक महिलांनी विविध वयोगटांतील सहभाग नोंदवला आणि आरोग्य व तंदुरुस्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा महत्वपूर्ण संदेश दिला. झुंबा सेशनपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
महिला सशक्तीकरण आणि आरोग्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली. सहभागी महिलांनी आनंदाने सायक्लोथॉन आणि वॉकथॉनमध्ये भाग घेत “तंदुरुस्त महिला, सक्षम समाज” हा संदेश दिला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी, स्वयंसेवक आणि विविध संस्थांचे विशेष आभार मानण्यात आले. फिटनेस आणि महिलांच्या आरोग्यासाठी असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.