 
            जागतिक महिला दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरण
जळगाव ः जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव येथे आट्यापाट्या खेळातील १५ महिला खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती अनुदान देऊन गौरव करण्यात आला.
जळगाव शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती अनुदान जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजू मामा भोळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या प्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, उपायुक्त निर्मला पेखळे, उपायुक्त अश्विनी गायकवाड-भोसले, उपायुक्त धनश्री शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योजने अंतर्गत सिद्धिविनायक विद्यालय व जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेच्या १५ महिला खेळाडूंचा प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती अनुदान देऊन गौरव करण्यात आला.
महिला खेळाडूंनी मिळविलेल्या या यशासाठी जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, मनपा क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे, सिद्धिविनायक फाउंडेशनच्या संचालिका डॉ अमृता सोनवणे, डॉ गौरव सोनवणे, मुख्याध्यापक आर पी खोडपे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक अनिल माकडे यांनी अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमात संस्कृती बाबुराव गवळे (५० हजार), चेतना विजय दांडगे (५० हजार), तेजस्विनी कचरू झांजे (५० हजार), दिव्या रामेश्वर काळे (५० हजार), हर्षदा संजय तायडे (५० हजार), दीक्षा संजय तेलंग (५० हजार), दीपिका प्रवीण पाटील (५० हजार), निशा हेमंत गायकवाड (२५ हजार), स्वाती धर्मेंद्र राऊत (२५ हजार), जया दिनेश वानखेडे (२५ हजार), जानवी भरत माळी (२५ हजार), रुपाली धर्मसिंग बारेला (२५ हजार), वैष्णवी उमेश अहिराणे (२५ हजार), रोहिणी सुनील धांडे (२५ हजार) या महिला खेळाडूंना ५० हजार व २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.



