
महिला दिनानिमित्त आयोजन
पुणे ः गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशनतर्फ जागतिक महिला दिनानिमित्त शिवनेरी किल्ला आणि नाणेघाट ट्रेकचेआयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि १०० हून अधिक महिलांनी यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, स. प. महाविद्यालयातील १० अंध विद्यार्थिनींनीही या ट्रेकमध्ये सहभागी होऊन त्याला एकअनोखे आणि प्रेरणादायक वळण दिले.
या ट्रेकला पुण्यातून प्रारंभ करून महिलांनी प्रथम शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. किल्ल्यावर शिवाई देवीचे दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात केली. सर्व सहभागी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला वंदन करत एकजुटीने पोवाडे गायले. या कार्यक्रमाने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शिवाईदेवीच्या स्थानाचा आणि राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नामकरण करत घेतलेल्या नवसाचे महत्त्व अधिक उजागर केले.
यावेळी, जुन्नर येथील महिला स्वयंसेवकांनी गडाची संपूर्ण माहिती उपस्थित महिलांना दिली. गडभेटी नंतर सर्व महिलांनी जुन्नर येथील आदिवासी वसतिगृहाला भेट दिली. वसतिगृहातील विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर करून महिलांचे स्वागत केले. तसेच, गिरिप्रेमी आणि स्वरूपसेवा संस्थेच्या माध्यमातून या वसतिगृहाला वॉटरप्युरिफायर भेट देण्याचा संकल्प करण्यात आला.
त्यानंतर महिलांनी नाणेघाटला भेट दिली. जिथे नाणेघाटाच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्वाबद्दल माहिती देण्यात आली. नाणेघाट गुहांमधील ब्राह्मीलिपीतील पुरातन शिलालेख, सातवाहन राजाचे नाव, तसेच नागनिकेच्या दानाबद्दल माहिती देण्यात आली. ट्रेकच्या शेवटी, नयनरम्य सूर्यास्ताचे दृश्य पाहून महिलांनी चहाचा आस्वाद घेत ट्रेकचा समारोप केला.
या विशेष ट्रेकच्या यशस्वीतेसाठी गिरिप्रेमी संस्थेच्या महिला गिर्यारोहकांनी व जुन्नर येथील इतिहास अभ्यासकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. इतिहास, निसर्ग आणि सामाजिक जाणिवेचा संगम घडवून हा ट्रेक महिलांसाठी एक प्रेरणादायक अनुभव ठरला.