
११व्या डेरवण यूथ गेम्सला प्रारंभ, सहा हजार खेळाडूंचा सहभाग
सावर्डे : डेरवण सारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारून स्थानिक खेळाडूंसह राज्यातील विविध खेळाडूंना खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद आहे. त्यामुळे डेरवण खेळाडू तयार करणारे एक हब ठरेल, असे प्रतिपादन अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या दीपाली देशपांडे यांनी केले. त्या ऑलिम्पियन स्वप्नील कुसाळे यांच्या प्रशिक्षिका आहेत हे सर्वश्रुत आहे.
चिपळूणनजीकच्या डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडा संकुलात डेरवण यूथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. हे स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दीपाली देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी दीपाली देशपांडे या बोलत होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात मुंबई विद्यापीठातील सुवर्णपदक विजेता शिवा माळी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली.
एसव्हीजेसीटीच्या क्रीडा संकुलात १७ मार्चपर्यंत अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, लंगडी, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या राज्यातील विविध भागांतून खेळाडू व संघ डेरवण येथे दाखल झाले आहेत. सुमारे ६ हजार खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. संघांमधील अटीतटीच्या लढती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी येथे येऊ लागले आहेत.
दीपाली देशपांडे यांनी स्वतःचे उदाहरण देत या क्रीडा स्पर्धांसाठी दाखल झालेल्या खेळाडूंना खेळासाठी मेहनत घेण्याचे आणि आपले व्यक्तिमत्त्व खेळाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कसे मांडावे हे पटवून दिले. उद्योजक कमलेश जोशी यांनी यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. दीपाली देशपांडे यांच्यासमवेत व्यासपीठावर उद्योजक कमलेश जोशी, रुग्णालयाच्या संचालिका डॉ सुवर्णा पाटील, शिक्षण संचालिका शरयू यशवंतराव, राष्ट्रीय टेबल टेनिसपटू अजित गाळवणकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे संदीप तावडे, एसव्हीजेसीटीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवाची सुरुवात कॅरम, फुटबॉल, खो-खो, लंगडी या खेळांनी करण्यात आली. सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, ठाणे, पुणे, मुंबई येथून दाखल झालेल्या संघांमध्ये लढती सुरू झाल्या आहेत. उद्घाटनानंतर लंगडी, खो-खो, फुटबॉल या खेळांच्या स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
विजेत्यांना लाखांची बक्षिसे
स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण ११०० पदके, ११५ चषक तसेच एकूण सोळा लाखांहून अधिक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.