
भक्ती पवारचे दमदार नाबाद शतक, साक्षी लामकाने, प्रतीक्षा नंदर्गीची चमकदार कामगिरी
सोलापूर ः सांगली येथील चिंतामणराव कॉलेजच्या मैदानावर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात सोलापूरच्या महिला संघाने धुळे जिल्हा संघावर २०२ धावांनी मात करत दणदणीत विजय प्राप्त केला. या विजयात अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना भक्ती पवार हिने नाबाद शतक झळकावले आणि गोलंदाजीमध्ये २ बळी घेतले. धुळे संघाचे ७ खेळाडू शून्य धावावर बाद झाले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सोलापूरच्या महिला संघाचे पहिले २ खेळाडू केवळ ४१ धावांवर माघारी परतले होते. यात कर्णधार साक्षी वाघमोडे (८) स्नेहा शिंदे (२०) यांच्यासोबत सलामीवीर भक्ती पवार हिने संयमी फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी गौरी पाटील (३५) सोबत १०२ धावांची भागीदारी केली. तसेच चौथ्या विकेटसाठी प्रतीक्षा नंदर्गी (नाबाद ५६) सोबत नाबाद ११२ धावांची भागीदारी करताना नाबाद १२५ धावा (९ चौकार) काढल्या.
निर्धारित ५० षटकात ३ बाद २५५ धावा करत सोलापूरने धुळे संघासमोर २५६ धावांचे आव्हान ठेवले. धुळे संघाकडून गौरी अहिरे (२-३६) व नेहा चव्हाण हिने १ बळी घेतला.

परंतु, धुळे संघाची सुरुवात अत्यंत निराशा जनक ठरली, पहिल्याच षटकात २ व तिसऱ्या षटकात १ असे केवळ ८ धावांवर ३ गडी बाद करत सोलापूरच्या महिलांनी सामन्यावर पकड मिळविली. त्यानंतर आलेल्या प्रेरणा काळे (१३) व कर्णधार निकिता मोरे (२०) या खेळाडूंनी थोडाफार प्रतिकार करायचा प्रयत्न केला. पण साक्षी लामकाने व भक्ती पवार यांनी त्यांना बाद करत सामना सोलापूरच्या बाजूने झुकविला व त्यानंतर आलेले सलग ४ खेळाडू शून्यावर बाद करत साक्षी लामकाने (४-२१), भक्ती पवार (२-५, प्रतीक्षा नंदर्गी (२-१२), आयुष्या भोसले १ बळी यांनी जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन करत २१.५ षटकात धुळे संघाला केवळ ५३ धावांवर गुंडाळले.
वरिष्ठ महिलांच्या एफ गटात परभणी व धुळे विरुद्ध असे २ विजय मिळवत सोलापूरचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. सोलापूर महिला संघाचे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, सेक्रेटरी धैर्यशील पाटील, चंद्रकांत रेंबर्सू व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या संघास निवड समिती चेअरमन किरण मणियार, स्नेहल जाधव, सारिका कुरनुरकर, मानसी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.