
विद्यार्थ्यांना गिर्यारोहण, रोप क्लाइंबिंगसह विविध साहसी उपक्रमांचा अनुभव
नागपूर (सतीश भालेराव) : विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी सी पी अँड बेरार द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूलच्या वतीने साहसी शिबिराचे आयोजन कोंढाळी येथील मेट या ठिकाणी करण्यात आले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात हे शिबीर मेठ (ता. कोंढाळी) येथे संपन्न झाले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध साहसी उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि नवनवीन कौशल्ये आत्मसात केली. शिबिरात गिर्यारोहण, ट्रेकिंग, रोप क्लाइंबिंग, रॅपलिंग, नदी पार करणे, जंगलातील मार्गक्रमण आणि विविध बचाव तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमता, मानसिक धैर्य आणि सहकार्य यांची कसोटी पाहणाऱ्या या उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रतिकूल परिस्थितीत कसे टिकून राहायचे, संकटांना कसे सामोरे जायचे आणि टीमवर्क कसे करायचे, याचे शिक्षण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळाले.
मार्गदर्शन आणि विशेष सत्रे याचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा दरम्यान साहसी खेळांचे तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वसंरक्षण, शिस्त, आत्मनिर्भरता आणि लीडरशिप यासारख्या गुणांचे महत्त्व सांगणाऱ्या विशेष सत्रांचे आयोजनही करण्यात आले होते. जंगलातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये तग धरून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षणही या शिबिरात देण्यात आले. शिबिराचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव पडदा. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली असून, त्यांच्यात टीमवर्क आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित झाली. साहसी उपक्रमांमुळे ते अधिक सक्षम, स्वावलंबी आणि धैर्यशील बनले आहेत.
शाळेचे संचालक अध्यक्ष अॅड अशोक बन्सोड आणि शाळेचे सचिव विजय कागभट विशेष करून उपस्थित होते. तसेच फॉरेस्ट ऑफिसर वर्धा एस. एस. सिद्दिकी यांनी विद्यार्थ्यांना जंगलातील त्यांचे अनुभव सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, जंगल सफारी करताना कशी काळजी घ्यायला हवी. जंगली प्राण्यांना त्रास न देता त्यांना बघण्याचाही आनंद कसा घ्यावा हेही सांगितले. तसेच जर एखादा प्राणी आपल्या समोर आला तर आपण काय करायला हवे याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी तसेच शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे आभार मानले. असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.