
आमदार सतीश चव्हाण यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर ः राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहात राहणार्या इयत्ता ११ वी व १२ वीच्या विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल व मे महिन्यातील सुट्टी कालावधीत वसतिगृहात राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी विधी मंडळात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन निवेदन दिले. शासकीय वसतिगृहात राहणार्या ११वी व १२वी विज्ञान शाखेतील मुला-मुलींना परीक्षा संपल्या असल्यास वसतिगृहात राहण्यास मनाई असल्याचे कळविले जाते. खरे तर अनेक महाविद्यालयांत मार्च अखेर पर्यंत ११वी विज्ञान वर्गाच्या तासिका सुरू असतात त्याच बरोबर एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा असतात. त्याचप्रमाणे ११वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी १२वी वर्गाच्या अतिरिक्त तासिकांसाठी उपस्थित राहतात. १२वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी जेईई, नीट, सीईटी यासारख्या परीक्षांची तयारी करतात. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ते आर्थिक परिस्थिती अभावी शहरात स्वतंत्र रूम करून राहू शकत नसल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश पूर्व परीक्षा मे महिन्यात असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षा होईपर्यंत एप्रिल व मे या महिन्यातील सुट्टी कालावधीत शासकीय वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली. यासंदर्भात त्वरीत योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी आमदार सतीश चव्हाण यांना आश्वस्त केले.