
मुंबईच्या स्पर्धेवर ठाण्याचे वर्चस्व, महिलांच्या शरीरसौष्ठवात मनीषा हळदणकर अव्वल
मुंबई ः खेळाडूंना आपल्या कष्टाची किंमत आणि आदर देणार्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सांगलीचा विश्वनाथ बकाली विजेता ठरला. आमदार महेश सावंत यांच्या कल्पनेतून झालेल्या या थरारक स्पर्धेत दिव्यांगांच्या गटात रत्नागिरीच्या गणेश गोसावीने तर महिलांच्या गटात ठाण्याच्या मनिषा हळदणकरने उपस्थितांची मने जिंकली.
राज्यभरातून आलेल्या ९५ दर्जेदार स्पर्धकांच्या अटीतटीच्या लढतीत ठाण्याने मुंबई आणि उपनगरच्या तगड्या खेळाडूंना मागे टाकत बाजी मारली. आठपैकी तीन गटात ठाण्याच्या खेळाडूंनी अव्वल स्थान पटकावले तर मुंबईच्या बप्पन दासलाच गटविजेतेपद जिंकता आले. शशांक वाकडेच्या अनुपस्थितीमुळे सांगलीच्या विश्वनाश बकालीपुढे कुणाचेच आव्हान टिकले नाही.
स्वामी समर्थ श्री स्पर्धेच्या निमित्ताने प्रभादेवी येथे शरीरसौष्ठव खेळाडूंची अप्रतिम कौशल्य पाहायला मिळाले. या क्लासिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची श्रीमंती अनुभवायला मिळाली. ९५ स्पर्धकांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत आपल्या आखीवरेखीव शरीरयष्टीचे प्रदर्शन करायला उतरलेल्या खेळाडूंवर स्वामी समर्थ मंडळाने अक्षरश: सव्वा तीन लाखांच्या रोख पुरस्कारांची उधळण केली.

ही स्पर्धा मुंबईत असली तरी या स्पर्धेत ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि अहिल्यानगरातील खेळाडू आपली करामत दाखवत होते. ५५ किलो वजनी गटात अव्वल स्थानासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. कोल्हापूरच्या अवधूत निगडेने ठाणेकर सागर मानेला मागे टाकत यश संपादले. ६० किलो वजनी गटात ठाण्याचा आशिष खांडेकर पहिला आला तर ६५ किलो वजनी गटात जागतिक कीर्तीचा नितीन म्हात्रे अव्वल ठरला. ७० किलो गटात मुंबईच्या बप्पन दासने बाजी मारली. मुंबईला एकमेव गट विजेतेपद त्यानेच जिंकून दिले. त्याच्या देहयष्टीसमोर सारेच खुजे वाटत होते. ७५ किलो गटात कोल्हापूरचा पंचाश्री लोणार पहिला आला. ८० किलो वजनी गटात सांगलीच्या हर्षद नेवेकरीने जळगावच्या जितेंद्र गिरीवर मात केली. ८५ किलो वजनी गटात विश्वनाथ बकालीच्या देहयष्टीसमोर कुणाचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे किताबाच्या लढतीत त्याने आपल्या सातही प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्वामी समर्थ श्रीवर आपले नाव कोरले. जगज्जेता नितीन म्हात्रे उपविजेता ठरला
…अन् महिलांनाही स्फुरण चढले
स्वामी समर्थने आपल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचेही आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यातील चार पीळदार युवतींनी सहभाग घेतला होता आणि त्या चौघी आपल्या पीळदार प्रदर्शनासाठी मंचावर उतरल्या तेव्हा त्यांचा खेळ पाहण्यासाठी मंचाच्या दोन्ही बाजूला असलेल्या चाळींच्या गॅलेरीत शेकडोंच्या संख्येने स्थानिक महिलांनी गर्दी केली होती. विभागात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेबाबत सार्यांनाच उत्सुकता होती आणि विभागातील महिलांनी या स्पर्धेचाच पुरेपूर आनंद घेतला.
या दिमाखदार स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि आमदार महेश सावंत, अध्यक्ष रामदास गावकर, कार्याध्यक्ष गिरीश सक्रे, उपाध्यक्ष चंद्रकांत परब, संजय भगत, संयुक्त कार्यवाह जयराम शेलार, बाळा बागडे, महिला कार्यकर्त्या शरण शेलार, निशा फोडकर, दीपाली जंगम, शीतल बोरकर, रेखा देवकर, किर्ती म्हस्के, संजना पाटील यांच्यासह शरीरसौष्ठव संघटनेचे दिग्गज पदाधिकारी राजेंद्र चव्हाण, प्रभाकर कदम, मनीष आडविलकर, मदन कडू, राज यादव, राजेंद्र गुप्ता यांच्या उपस्थितीत पार पडला.
शरीरसौष्ठव स्पर्धेचा अंतिम निकाल
५५ किलो वजनी गट : १. अवधूत निगडे (कोल्हापूर), २.सागर माने (ठाणे), ३. मंगेश पाटील (नवी मुंबई, ४. प्रमोद सूर्यवंशी (सांगली), ५. रामदास भरतव (ठाणे)
६० किलो : १. आशिष खांडेकर (ठाणे) , २. आकाश बोर्डे (अहिल्यानगर), ३. इम्रान अली (जळगाव, ४. अभिषेक खाडे (अहिल्यानगर), ५. योगेंद्र फुंंदरे (कोल्हापूर)
६५ किलो : १. नितीन म्हात्रे (ठाणे), २. अरुण पाटील (रायगड), ३. रामा मायनाक (सातारा), ४. अनिकेत साळुंखे (मुंबई), ५. संतोष मल्ला (ठाणे).
७० किलो : १. बप्पन दास (मुंबई), , २. अभिषेक पवार (मुंबई), ३. गोपाळ कोलवाल (धुळे), ४. भावेश भोईर (ठाणे), ५. मोहसीन शेख (नाशिक).
७५ किलो : १. पंचाश्री लोणार (कोल्हापूर), २. मुश्रीफ खान (ठाणे), ३. मयूर साठवे (ठाणे), महेश पवार (मुंबई), ५. लक्ष्मण पाटील (मुंबई).
८० किलो : १. हर्षद नेवेकरी (सांगली), २. जितेंद्र गिरी (जळगाव), ३. अभिजीत आडळे (पुणे), ४. ओमकार नलावडे (पुणे), ५. रोहित दळवी (कोल्हापूर).
८५ किलो : १. विश्वनाथ बकाली (सांगली), २. राहुल पाटील (नाशिक), ३. दिपक देवाळे (नाशिक), ४. सज्जन थोरात (अहिल्यानगर), ५. मन्सूर शेख (अहिल्यानगर)
८५ किलोवरील : १. राहुले शेत्रे (ठाणे), २. शुभम वेताळ (ठाणे), ३. महेश शेट्टी (मुंबई), ४. प्रशांत हनगुडे (ठाणे), ५. मुश्ताक शेख (नाशिक).
महिला शरीरसौष्ठव : १. मनिषा हळदणकर (ठाणे), २. सरिता लोखंडे (पालघर), ३. ऋतुजा काळे (नाशिक), ४. अल्का कोकणे (पुणे).
दिव्यांग शरीरसौष्ठव : १. गणेश गोसावी (रत्नागिरी), २. महबूब शेख (मुंबई), ३. रविंद्र कदम (मुंबई), ४. प्रथमेश भोसले (मुंबई), ५. फिरोज शेख (जळगाव).