ऑलिम्पिक प्रदर्शन खेळाडूंचे आकर्षणाचे केंद्रबिंदू

  • By admin
  • March 11, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

डेरवण यूथ गेम्समध्ये स्विमिंग खेळाची प्रदर्शनाद्वारे माहिती

चिपळूण: डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात ११व्या यूथ गेम्सला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या खेळांची प्रदर्शनाद्वारे माहिती दिली जाते. यावर्षी जलतरण या खेळाच्या उत्पत्तीपासून आजतागायत प्रगतीबाबत माहिती देण्यात आली आहे.

ऑलिम्पिक प्रदर्शनाचे उद्घाटन द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या दिपाली देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक कमलेश जोशी आणि क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जलतरण या प्रकारात मोडणाऱ्या जलतरण, डायव्हिंग आणि आर्टिस्टिक स्विमिंग या प्रकाराच्या २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी व आत्तापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी नमूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त एसव्हिजेसिटी स्पोर्ट्स अकॅडमीच्या जलतरणपटूंची माहिती आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे. 

जलतरणमधील ५०, १००, २००, ४००, ८०० आणि १५०० मीटर या विविध गटांतील ऑलिम्पिक विजेत्यांची नावे, जन्म दिवस, देश आणि प्रत्येक प्रकारातील वैयक्तिक कामगिरी यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. डायव्हिंग या प्रकारातील ३ मीटर स्प्रिंग बोर्ड आणि १० मीटर प्लॅटफॉर्म या प्रकारातील वैयक्तिक आणि सिक्रोनाईज्ड प्रकारातील विजेत्यांची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच आर्टिस्टिक स्विमिंगमधील ड्युएट आणि टीम प्रकारातील ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी व आत्तापर्यंतचा विक्रम नमूद करण्यात आलेला आहे.

चांगला खेळाडू वंचित राहणार नाही हेच उद्दिष्ट 
मी डेरवणच्या एसव्हिजेसिटी या अकॅडमीत २०१८ साली प्रवेश केला. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा तसेच प्रशिक्षक यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी स्विमिंग या खेळात नैपुण्य प्राप्त करू शकले. आत्तापर्यंत विविध सागरी जलतरण स्पर्धेत मी सहभागी झाले असून, २० पेक्षा अधिक सुवर्णपदके मिळवली आहेत. अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्वच सुविधा नि:शुल्क आहेत. आर्थिक अडचणीमुळे चांगला खेळाडू खेळापासून वंचित राहू नये असे उद्दिष्ट ठेवून अ‍कॅडमीचे कामकाज नेहमी सुरू असते, अशी माहिती राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेती श्रावणी वालावलकर हिने दिली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *